Nitin gadkari : नवं पुणं उभारा : शहराला प्रदूषण, वाहतूक कोंडीचा विळखा : नितीन गडकरी | पुढारी

Nitin gadkari : नवं पुणं उभारा : शहराला प्रदूषण, वाहतूक कोंडीचा विळखा : नितीन गडकरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहराला प्रदूषण आणि वाहतूक कोंडीचा विळखा बसला आहे. आताचे पुणे पूर्वीसारखे राहिलेले नाही. नवी दिल्ली, नवी मुंबईसारखे पुणे काही नवे झाले नाही. नवे पुणे उभारायला वाव आहे. प्रस्तावित पुणे-औरंगाबाद द्रुतगती महामार्ग, पुणे-बेंगळुरू रस्त्यावर नवे शहर वसविता येईल, असे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नवे पुणे उभारण्याचे आवाहन शुक्रवारी केले.

संबंधित बातम्या :

कॉन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स ऑफ इंडियाच्या (क्रेडाई) 40 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. येरवड्यातील एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष बोमन इराणी, रणजित नाईकनवरे, सतीश मगर, शांतिलाल मुथा, ललितकुमार जैन, कुमार गेरा या वेळी उपस्थित होते.

शहरे विस्तारत आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी आता ग्रामीण भागाकडे वळले पाहिजे. स्मार्ट व्हिलेज उभारावीत. पुणे-औरंगाबाद, पुणे-बेंगळुरू महामार्गानजीक स्मार्ट शहरे उभारणे शक्य आहे. बांधकाम व्यावसायिक जेव्हा झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) उभारतात तेव्हा त्याची गुणवत्ता त्यांच्या व्यावसायिक प्रकल्पापेक्षा कमी असते, असा आक्षेप पालकमंत्री पाटील यांनी केला.

बांधकाम खर्च कमी करा…

बांधकाम प्रकल्पासाठी जमीन आणि सिमेंट, लोखंडासारखे साहित्य महत्त्वाचे असते. त्यांचा खर्च अधिक आहे. यात काम करणार्‍या काही मोजक्या कंपन्या कच्च्या मालाचे भाव ठरवतात. त्यामुळे भाव वाढतो. गुणवत्तेशी तडजोड न करता नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बांधकाम खर्च कमी करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.

2030 पर्यंत बांधकाम क्षेत्राची उलाढाल 1 लाख कोटी डॉलरवर जाईल. आणखी 60 कोटी लोक शहरीकरणाचा भाग होतील. त्यामुळे नव्या संधी उपलब्ध होतील. अनेक गृहसंस्थांचे पुनर्निर्माण करावे लागेल. त्यामुळे अशा प्रकल्पांवर वस्तू आणि सेवा कर आकारू नये. लेबर सेसअंतर्गत जमा झालेल्या 12 हजार कोटी रुपयांच्या रकमेतून कामगार कौशल्याचे उपक्रम राबविण्यात यावेत.

-बोमन इराणी, राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई

हेही वाचा

नाशिक : जिल्ह्यातील ३६५ पैकी १६३ बंधारे ओ‌व्हरफ्लो

अबोल प्रीतीची अजब कहाणी : मयुरी खेळणार राजवीरसोबत मंगळागौर

Pune News : ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ची अंमलबजावणी नाहीच; ससूनमधील चित्र

Back to top button