पुणे : छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आपण जसे उत्साहात साजरे करत आहोत तसेच 2024 मधील लोकसभा निवडणुकीत 350 जागांचे लक्ष्य गाठून दिल्ली तख्त पुन्हा एकहाती ताब्यात घेण्याचा भारतीय जनता पक्षाचा संकल्प पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीत मांडल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. संघाच्या समन्वय समितीची तीनदिवसीय बैठक पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू आहे.
संबंधित बातम्या :
विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या संघाच्या छत्तीस संस्था-संघटनांचा वार्षिक आढावा या बैठकीत घेण्यात येत आहे. तसेच त्या त्या संस्था-संघटनांचे आगामी वर्षाचे नियोजनही सादर करण्यात येत आहे. संघाच्या या छत्तीस संस्था-संघटनांपैकी भारतीय जनता पक्ष एक असून, या पक्षातर्फे नड्डा यांनी सादरीकरण केले. नड्डा यांनी बैठकीत पक्षाच्या वार्षिक कामगिरीचा आढावा सादर केला, तसेच पुढील वर्षाचे नियोजनही मांडले. पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होणार असून, त्या निवडणुकीला आपण कसे सामोरे जाणार, याविषयीचे मुद्दे त्यांनी विशद केले.
बैठकीत भाजपने केलेल्या सादरीकरणावर देशभरातून आलेल्या प्रतिनिधींची मते जाणून घेण्यात आली. यात सर्व प्रतिनिधींनी कोणताही संकोच न बाळगता आपापल्या प्रदेशातील संघटनेची प्रतिमा मांडली. चर्चेअंती संघाच्या वतीने पदाधिकार्यांना मार्गदर्शन करून निश्चित केलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी कामाला लागण्याचे संकेत देण्यात आल्याचे समजते. बैठकीच्या पहिल्याच दिवशी नड्डा यांनी सविस्तर सादरीकरण करीत पक्ष काय तयारी करतो आहे, त्याची रूपरेषा सांगितली. त्यानंतर शुक्रवारी पहाटे नड्डा दिल्लीकडे रवाना झाले.
या बैठकीत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा येणार असल्याची जोरदार चर्चा झाली होती. मात्र, संघाच्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या चर्चेला पूर्णविराम दिला. बैठकीच्या पहिल्या व दुसर्या दिवशी मिळून 30 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी त्यांच्या कामाचा अहवाल देत मते मांडल्याचे समजते.
संघाच्या बैठकीचा शनिवारी समारोप होत असून, दुपारी 12 वाजता तीन दिवसांत झालेल्या चर्चेचा गोषवारा प्रसारमाध्यमांना दिला जाणार आहे. या पत्रपरिषदेत राजकीय प्रश्नांबरोबर राज्यातील घडामोडींबाबत प्रश्न विचारण्याची मुभा असल्याचे माध्यम प्रतिनिधींनी सांगितले.
नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या जी-20 गटाच्या यशस्वी बैठकीनंतर देशाचा डंका जगभरात गेला. महासत्ता असलेल्या अनेक देशांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करीत त्यांच्या नेतृत्वाला जगन्मान्यता दिली. त्याचाही उल्लेख यावेळी करण्यात आला. देशभर अजूनही मोदी लाट कायम असून, थोडे परिश्रम घेतल्यास 350 चा आकडा गाठणे शक्य होऊ शकते, असेही या सादरीकरणात नमूद करण्यात आले.
हेही वाचा