वॉशिंग्टन : लाखो वर्षांपूर्वी ज्यावेळी जमिनीवर डायनासोरचे साम-ाज्य होते, त्यावेळी महासागरांमध्ये मोठ्या आकाराचे सरीसृपही वावरत होते. त्यापैकी प्लेसिओसॉर्स आणि तत्सम प्राण्यांमध्ये अतिशय लांब व सापासारखी मान विकसित झाली. आता एका नव्या संशोधनात दिसून आले आहे की, महासंहाराच्या घटनेनंतर या सागरी जलचरांमध्ये वेगाने ही लांब मान विकसित झाली होती. त्यांच्या मणक्यामध्ये नवे भाग जोडले गेले होते व ही मान लांब होत गेली.
चीन आणि अमेरिकेतील संशोधकांनी 'पॅचिप्लेरोसॉर' नावाच्या सागरी सरीसृपाच्या जीवाश्माचा अभ्यास करून याबाबतचे निष्कर्ष काढले आहेत. हे प्राणी 251.9 ते 201.3 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या 'ट्रायासिक' काळातील आहेत. डायनासोरचे युग सुरू होण्यापूर्वीच त्यांचा र्हास झाला. या नव्या प्रजातीला संशोधकांनी 'चुसॉरस झियानजेन्सिस' असे नाव दिले आहे. त्यांची मान त्यांच्या धडाचा निम्मा भाग व्यापत असे.
याबाबतच्या संशोधनाची माहिती 'बीएमसी इकॉलॉजी अँड इव्होल्युशन' या नियतकालिकात देण्यात आली आहे. ट्रायासिक काळाच्या विविध टप्प्यातील वेगवेगळ्या टप्प्यातील पॅचिप्लुरोसॉर्सचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी असे दिसून आले की, केवळ 50 लाख वर्षांच्या काळातच त्यांच्या धडापासून मानेची लांबी 40 टक्के ते 90 टक्के वाढली होती. त्यानंतरच्या काळात ही वेगाने होत असलेली वाढ मंदावली.