पुणे: खंडोबा मंदिराचा गाभारा उद्यापासून दीड महिना बंद, जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामे होणार सुरू

पुणे: खंडोबा मंदिराचा गाभारा उद्यापासून दीड महिना बंद, जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामे होणार सुरू
Published on
Updated on

जेजुरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: जेजुरीच्या खंडोबा गडावरील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा (सभामंडप) सोमवार (दि. २८)पासून दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना बंद राहणार आहे. या काळात गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून, दोन्ही गाभाऱ्यांत जाता येणार नाही. २८ ऑगस्ट ते ५ ऑक्टोबरपर्यंत गाभारा दुरुस्तीचे काम चालणार असल्याची माहिती खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी दिली.

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा गडावर महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू असून ऐतिहासिक खंडोबा गडाचे जतन करण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना केल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी सुमारे १०९ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. खंडोबा देवस्थानच्या कार्यालयात मंदिरातील विकासकामांच्या नियोजनासंदर्भात पुजारी, सेवक, ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे, ॲड. पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल सौंदाडे, मंगेश घोणे, ॲड. विश्वास पानसे, अभिजित देवकाते, व्यवस्थापक राजेंद्र जगताप, प्रमोद चव्हाण आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये पुजारी-सेवक व ग्रामस्थांनी अनेक सूचना केल्या. यामध्ये प्रामुख्याने मुख्य गाभाऱ्याचे काम सुरू असताना गडावर येणाऱ्या भाविकांचे अभिषेक, महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करण्यात याव्यात, आतील गाभाऱ्याचे काम पूर्ण झाल्यावर पंचलिंग मंदिराची दुरुस्ती करण्यात यावी, तेथील काम हाती घेतल्यावर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य मंदिरात पूजा करू द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

पुजारी, सेवक व भाविकांची सोय बघूनच विकासकामे केली जात आहेत. गडावरील पुजारी, खांदेकरी, मानकरी, गावकरी या सर्वांनी खंडोबा मंदिराचे संवर्धन करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विकासकामांना सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी विश्वस्त मंडळाने केले. या बैठकीसाठी पालिकेतील विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, महेश जेजुरीकर, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, छबन कुदळे, कृष्णा कुदळे, माजी विश्वस्त सुधीर गोडसे, पंकज निकुडे, नितीन राऊत, प्रकाश खाडे, माधव बारभाई, समीर मोरे व पुजारी- ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासकामांसाठी समिती तयार

विकासकामे व्यवस्थित पार पाडण्यासाठी पुजारी, सेवक व विश्वस्त मंडळाची समिती तयार करण्यात आली आहे. मुख्य गाभारा, घोड्याचा गाभारा, पंचलिंग मंदिर व भुलेश्वर मंदिर, भंडार घर आणि तुळजाभवानी मंदिर या मंदिरातील कामे होणार आहेत.

खंडोबाची त्रिकाळ पूजा सुरू राहणार

खंडोबा गडाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असले, तरी भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म, कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र, इतर कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही, असे विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले.

हेही वाचा: 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news