पुणेः दोन कोटींचे मोबाईल चोरणार्‍या टोळीतील एकाला अटक | पुढारी

पुणेः दोन कोटींचे मोबाईल चोरणार्‍या टोळीतील एकाला अटक

पुणेः पुढारी वृत्तसेवा :  केसनंद रस्ता परिसरात असलेल्या अ‍ॅपल कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी करून तब्बल दोन कोटी रुपये किमतीचे 266 मोबाईल चोरणार्या टोळीतील एकाला लोणीकंद पोलिसांनी झारखंड राज्यातून अटक केली. तर, त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींनी एजंटच्या माध्यमातून बांग्लादेशात मोबाईल विकल्याचे समोर आले आहे. सलीम ऊर्फ असराऊल इस्माईल फजल शेख (35, रा. साहेबगंज, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.17 जुलै रोजी केसनंद रस्त्यावरील अ‍ॅपलच्या गोडाऊनमध्ये चोरीची घटना घडली होती. या वेळी चोरट्यांनी येथील गोडाऊनमध्ये प्रवेश करून तब्बल 266 मोबाईल चोरी करून नेले होते. पसार आरोपींचा लोणीकंद पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता.

गुन्ह्याची पद्धत आणि यापूर्वीच्या अशा काही गुन्ह्यांच्या टोळ्यांचा अभ्यास केल्यानंतर झारखंडमधील साहेबगंज भागातील टोळ्या सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणीकंद पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक गजानन जाधव यांचे पथक झारखंडमधील साहेबंगज येथे गेले. मात्र, आरोपी पश्चिम बंगालमध्ये पळून गेल्याने मिळाले नाहीत. यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा पोलिसांचे पथक झारखंडला रवाना झाले. या वेळी सलीम शेख पोलिसांना सापडला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली, तसेच हा मुद्देमाल आरोपीने एका एजंटच्या माध्यमातून विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून सलीमच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, रवींद्र गोडसे, अंमलदार स्वप्निल जाधव, कैलास साळुंके, अजित फरांदे, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा :

1 हजार किलो गोमांस पकडले; संगमनेर पोलिसांची कारवाई

पुणे : अपहरण करून डॉक्टरला लुटणारी टोळी जेरबंद

 

 

 

Back to top button