पुणे : पीएमपी बसचालकांच्या संपाचा प्रवाशांना फटका | पुढारी

पुणे : पीएमपी बसचालकांच्या संपाचा प्रवाशांना फटका

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसवर कार्यरत असलेल्या ट्रॅव्हल टाईम कंपनीच्या बसचालकांनी शुक्रवारी (दि. 25) अचानक संप केला. त्यामुळे पीएमपीच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून, प्रवाशांचे हाल झाले. पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 181 बस आहेत. त्यातील काही बस ठेकेदारांच्या भाडेतत्त्वावरील, तर काही स्वमालकीच्या आहेत. सुमारे 4 हजार चालकांमार्फत शहरात बससेवा पुरविली जाते. 2 हजार चालक पीएमपीचे स्वत:चे, तर 2 हजार ठेकेदारांचे आहेत. यातीलच ट्रॅव्हल टाईम कंपनीकडील 200 चालकांनी शुक्रवारी अचानक संप केला. सुमारे 1700 ते 1750 गाड्या दररोज मार्गावर असायच्या. परंतु, शुक्रवारी मार्गावरील बसची संख्या काही प्रमाणात कमी झाली.
पीएमपीच्या काही खासगी बस ठेकेदारांकडील चालकांनी शुक्रवारी सकाळच्या सत्रात प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता संप पुकारला. संपामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी पीएमपीकडील सर्व अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक व चालक यांच्या  साप्ताहिक सुट्या रद्द करून जवळपास सर्व शेड्यूल मार्गस्थ करण्यात आले.
                                                                               – सतीश गाटे, जनसंपर्क  अधिकारी, पीएमपीएमएल
या मागणीसाठी चालकांनी केला संप…
आम्ही शहरात राहतो, शहरात महागाई भरपूर आहे. किमान 750 ते 900 रुपयांपर्यंत आम्हाला रोज मिळायला हवा. मात्र, ठेकेदार आम्हाला फक्त 530 रुपये रोज देत आहे. एवढ्याशा पगारात आम्ही घर कसे चालवणार? त्यामुळे पीएमपी प्रशासनाने यात मध्यस्थी करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी संपावर गेलेल्या चालकांकडून करण्यात येत आहे.

Back to top button