पुणे : अकरा समाविष्ट गावांचा डीपी पुन्हा लांबणीवर | पुढारी

पुणे : अकरा समाविष्ट गावांचा डीपी पुन्हा लांबणीवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  समाविष्ट 11 गावांच्या विकास आराखड्याला (डीपी) 1 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढीची मागणी करणारा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून शहर सुधारणा समितीपुढे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या गावांच्या डीपीची कार्यवाही पुन्हा लांबण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने ऑक्टोबर 2017 मध्ये लोहगाव, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, उंड्री, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, धायरी, शिवणे, उत्तमनगर या 11 गावांचा समावेश महापालिकेत केला. प्रशासनाने या गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

या आराखड्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यासाठी अधिसूचना आणि शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी 25 जून 2022 पर्यंत मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव नगररचना विभागाला पाठवण्यात आला होता. नगररचना विभागाने मुदतवाढ देण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाला कळवले होते. त्यावर महापालिका प्रशासनाने गावे समाविष्ट झाल्यानंतर लोकसभा, हद्दवाढ, पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुका झाल्या. नियमानुसार मुदतीमधून आचारसंहिता कालावधी 142 दिवस वगळण्यात यावा. त्याचबरोबर कोरोना काळातील 738 दिवसांचा कालावधी ग्राह्य धरून 1 मार्च 2014 पर्यंत मुदतवाढ मागण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या संदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने शहर सुधारणा समितीपुढे ठेवला आहे.

डीपी आवश्यक
समाविष्ट 11 गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी लवकरात लवकर डीपी होणे आवश्यक आहे. वेळ लांबत गेल्यास आरक्षणासाठी जागा राहत नाही. त्याचबरोबर अनधिकृत बांधकामे आणि भविष्यात भूसंपादनाचे प्रश्न निर्माण होणार आहेत.

हेही वाचा :

दादांचा कारभार पुन्हा पालकमंत्री स्टाईल! पुणे जिल्ह्याच्या राजकारणाला दे धक्का

शरद पवारांच्या वक्तव्याचे स्वागत, आमचीही तीच भूमिका! भुजबळ यांच्या प्रतिक्रियेने संशयकल्लोळात भर

Back to top button