खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी वकिलाच्या कारच्या सायलन्सरला पिस्तुल लावल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर कासुर्डी टोलनाक्यावर उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (दि. १४) दुपारी उघडकीस आली.
याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी चार वाजता महामार्गावर पोलिसांनी गाड्या तपासणी सुरू केली. यावेळी कार मालक भारत मांडे व त्यांची पत्नी स्नेहल भारत मांडे यांच्या कारच्या (एम.एच.12 आर.टी 8657) पाठीमागील बाजुस पिस्तुल असल्याचे आढळून आले. त्यांनी दिलेल्या जबाबनुसार संशयित आराेपी राहुल राजाराम रणदिवे व प्रसाद तानाजी अनपट (दोघे रा. इंदापुर, जि. पुणे) यांच्याविराेधात गुन्हा दाखल झाला आहे.
संशयित राहुल रणदिवे व प्रसाद अनपट यांनी त्यांचा ओळखीचा कुबेर (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याचेकडून एक पिस्तुल विकत घेतले. ते एका प्लास्टीकचे पिशवीत गुंडाळुन तारेने बांधुन वकील मांडे यांच्या कारच्या सायलेन्सरजवळ बांधले. हा प्रकार कासुर्डी टोलनाक्यावर उघड झाला.
या प्रकरणी वकील भारत मांडे व त्यांचे पत्नी स्नेहल मांडे यांचे विरूध्द खोटा पुरावा तयार केला म्हणून राहुल रणदिवे व प्रसाद अनपट व इतर यांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी फिर्याद दिली. दाेघांवर गुन्हा दाखल झाला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक तावरे करीत आहे.