चित्रा वाघ- रुपाली चाकणकर यांच्यात ‘रामायण’ ; ट्विटवरून वाघ ट्रोल | पुढारी

चित्रा वाघ- रुपाली चाकणकर यांच्यात ‘रामायण’ ; ट्विटवरून वाघ ट्रोल

पुढारी ऑनलाईन डेस्क

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्‍या नियुक्तीवरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि ज्यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे त्या रुपाली चाकणकर यांच्यात आता रामायण सुरु होण्याची चिन्हे आहेत. चित्रा वाघ यांनी चाकणकर यांच्यावर टीका करणारे ट्विट केले असून त्यावरून वाघ यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे.

वाघ यांनी आज सकाळी नऊ वाजता ट्विट केले असून त्यात म्हटले आहे, ‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत, पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा; पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल.’

चित्रा वाघ यांनी हे ट्विट करताच त्यांना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले आहे. वाघ राष्ट्रवादीत असताना त्यांनी केलेली भाजपवरील टीकेचे स्क्रीनशॉट टाकले आहेत. वाघ यांच्या पतीच्या कथित लाचप्रकरणामुळे त्यांना भाजपमध्ये जावे लागले, अशी टीका अनेकांनी केली आहे. तुमचे नशीब तुम्हाला भाजपमध्ये घेऊन गेले. तुमच्या पतीला वाचविण्यासाठी तुम्ही भाजपमध्ये गेलात त्यामुळे रुपाली चाकणकर त्याला काय करणार, असेही काही यूजर्स विचारत आहेत.

एकाने म्हटले आहे, ‘ताई… लखीमपूर बद्दल काही प्रतिक्रिया दिली नाही. महाराष्ट्राला लाभलेली आपणच शूर्पनखा दिसत आहात. नेहमी आपण महाराष्ट्राच्या विरोधातच बोलत असता. तुमचा रावण देशाची वाट लावतोय ते दिसत नाही का. तुम्ही फक्त महाराष्ट्राला टार्गेट का करता?’

संजय घेवडे या यूजरने म्हटले आहे, ताई काय हे,काय ही भाषा ? अजून चाकणकर यांचे नाव अधिकृतपणे घोषित झालेही नाही. त्‍यापूर्वीच  लगचेच पोटदुखीला सुरुवात ? कधीकाळी तुम्ही एकत्र काम केलेय. आज त्यांना त्यांच्या कर्तृत्वाने आणि नशीबाने मोठी संधी मिळत असेल तर काय हरकत आहे? त्याचं मोठ्या मनाने स्वागत करायला हवे.

अन्य एका यूजरने म्हटले आह, ‘तुमचं दुःख, वेदना समजू शकतो. तुमच्या मागून आपल्यापेक्षा वयाने लहान मंत्री आपल्या पुढे गेली याचं दुःख होणे साहजिक आहे.

हेही वाचा : 

Back to top button