कोरोना मृतांच्या कुटुंबाला दरमहा ५ हजार मदत ; ‘या’ राज्याने घेतला निर्णय - पुढारी

कोरोना मृतांच्या कुटुंबाला दरमहा ५ हजार मदत ; ‘या’ राज्याने घेतला निर्णय

तिरुअनंतपुरम, पुढारी ऑनलाईन

कोरोना मृतांच्या कुटुंबाला मदत प्रतिमहिना पाच हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री पी विजयन सरकारने ही घोषणा केली. ही मदत पूर्वीपासून मिळत असलेल्या आर्थिक मदतीपेक्षा वेगळी असेल. म्हणजेच, पीडित कुटुंबांना या अगोदर सरकारकडून दिली जाणारी आर्थिक मदतही उपलब्ध होणार आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी हा लाभ मिळणार आहे.

पुढील तीन वर्षांसाठी ही रक्कम दिली जाणार आहे. केरळमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. प्रचंड मनुष्यहानी झाली हाेती. अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्याने निर्वाह करण्याचा मोठा प्रश्न उभा होता. अशा कुटुंबांना वित्तसहाय्य द्यावे, अशी मागणी करण्यात येत होती.

मंत्रिमंडळाच्या निर्णयासंबंधी केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून बुधवारी घोषणा करण्यात आली. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना प्रतिमहिना पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केरळ सरकारने केली आहे. ज्या कुटुंबांना ही मदत दिली जाणार आहे. त्या कुटुंबांना समाजकल्याण, कल्याणकोष किंवा इतर पेन्शन मिळत असेल तर त्यापासून वंचित ठेवता येणार नाही. केरळचा रहिवाशी असलेल्या कुठल्याही व्यक्तीचा देशभरात कुठेही मृत्यू झाला असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कोरोना मृतांच्या कुटुंबाला मदत

दरमहा पाच हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी संबंधितांना एक अर्ज दाखल करावा लागेल. संबंधित जिल्हाधिकारी आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविली आहे. या योजनेचा लाभ अर्ज केल्यानंतर ३० कामकाजी दिवसांच्या आत मिळणार आहे. कुटुंबामध्ये एखाद्‍या व्यक्ती सरकारी नोकरी किंवा आयकर भरत असेल तर ही रक्कम मिळणार नाही.  ही रक्कम थेट लाभार्थाींच्‍या बँक खात्यात जमा होणार आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button