शरद पवार यांचे जुने सहकारी मित्र जमा मोरे यांचे निधन | पुढारी

शरद पवार यांचे जुने सहकारी मित्र जमा मोरे यांचे निधन

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मित्र इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील जगन्नाथराव मारुतीराव मोरे उर्फ ज. मा. मोरे यांचे बुधवारी (दि.६) सकाळी सहा वाजता निधन झाले. त्यांचे वय ८८ होते. ‘जमा आप्पा’ म्हणून ते सर्वदूर परिचित होते. त्यांच्या मागे मुलगा भारत, नातू समीर, सुना, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार आहे.

शरद पवार व जमा मोरे यांचे फार घनिष्ट मित्रत्व होते. पवारांचे ४६ वर्षाचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ते ओळखले जात. जमा मोरे यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तसेच इंदापूर तालुका पंचायत समितीच्या स्थापनेच्या सुरुवातीलाच दहा वर्ष सभापतीपदी (१ मे १९६२ ते ५ ऑगस्ट १९७२) कार्यरत होते.

सन 1975 सालापासून पवार आणि मोरे यांचे संबंध आजपर्यंत टिकून होते. निमगाव केतकीवरून पुढे कुठेही जात असताना पवार हे ‘जमा आप्पा’ यांना भेटल्याशिवाय जात नव्हते. निमगाव केतकीत शरद पवार व गोविंदराव आदिक यांची मोरे यांनी हत्तीवरून मिरवणूक काढली होती. तो प्रसंग आजही गावकरी मोठ्या उत्साहाने सांगतात. शरद पवार यांच्या बरोबर फारूक अब्दुल्ला यांच्या प्रचारासाठी जम्मू पर्यंत ते गेले होते.
मोरे यांची ‘सेकंड आमदार’ म्हणून ओळख होती. विधानसभेच्या निवडणुका लढविल्यानंतर त्यांची सेकंड आमदार म्हणून ओळख निर्माण झाल्याने त्यांचा राजकारणात व प्रशासनात धबधबा यातून दिसायचा.

मोरे यांनी त्यांच्या कारकिर्दीत गावासह तालुक्यात अनेक विकासकामे केली. पवार कुटुंबाशी त्यांचे अंत्यत जिव्हाळ्याचे संबध होते. विनोदी शैलीची आप्पांची भाषणे ऐकायला मोठी गर्दी होत असे. पवार यांच्याबरोबरचे अनुभव प्रसंग व संपूर्ण कारकिर्दीचा लेखाजोखा त्यांनी ‘गुंफियले मोती मैत्रीचे’ या पुस्तकातून प्रकाशितदेखील केला आहे.

शरद पवार आणि जमा मोरे यांचा स्नेहसंबंध ४५ वर्षाचा

यात स्वतः शरद पवार यांनी जमा मोरे यांचा आणि माझा स्नेहसंबंध सुमारे 45 वर्षाचा आहे. आणि काळाच्या ओघात तो सतत वृद्धिंगत होत गेला आहे. राजकीय व सामाजिक जीवनात व्यग्र झाल्यामुळे माझे व्याप वाढले. परंतु गावाकडील माणसांची माझा सततचा संपर्क राहिला. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत गावाकडे जी माणसे कायम साथ देत आली त्यात ज. मा. यांचे देखील नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. काटेवाडी व जमा यांचे गाव निमगाव केतकी यात फारसे अंतर नसल्याने त्यांच्या घरी सतत राबता होता. सुरुवातीला माझे बंधू अनंतराव यांच्यासोबत जमा असत. तीन-चार वर्षांनी अनंतरावांनी जमा माझ्या सोबतीला दिले आणि काही काळातच ते माझी एक निष्ठावान सहकारी म्हणून ओळखू लागले. मी पहिल्यांदा 1978 साले मुख्यमंत्री झालो तेव्हा त्यांना प्रचंड आनंद झाला आणि निमगाव केतकी गावातून माझी हत्तीवरून जंगी मिरवणूक काढून स्वागत केले. तो दिवस आजही माझ्या स्मरणात आहे. कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा ती साध्य होईपर्यंत करत राहणे हे जमांचे वैशिष्ट…याचे मला कौतुक वाटते. जमा यांनी गुंफियीले मोती मैत्रीचे हे सचित्र पुस्तक वाचताना पुन्हा ते मंतरलेले दिवस आठवतात, असे लिहिले आहे.

राज्यातील व देशातील अनेक आजी-माजी मंत्री हेदेखील जमा मोरे यांचे नाव घेतले असता तातडीने ओळखायचे व त्यांचा आणि मोरे यांचा कुठेना कुठे संबंध आलेला असायचाच. अनेकवेळा पवार यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मंत्रीगण, खासदार, आमदार त्यांच्याकडे आवर्जून भेट देण्यासाठी येत असत. त्यांच्या जाण्याने गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा :

Back to top button