राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सर्वपक्षीयांकडून खिंडीत गाठण्याचा प्रयत्न | पुढारी

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सर्वपक्षीयांकडून खिंडीत गाठण्याचा प्रयत्न

जयसिंगपूर; संतोष बामणे : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे रणांगण काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. शिरोळ तालुक्यातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विरुद्ध दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी मोट बांधली असून, तालुक्यातील राजकारणात नवी समीकरणे निर्माण झाली आहेत. सर्वपक्षीयांकडून गणपतराव पाटील यांना उमेदवारी देऊन ना. यड्रावकरांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सुरू आहे.

गत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांच्यात लढत झाली होती. यात यड्रावकर यांनी बाजी मारली होती. सध्या गणपतराव पाटील यांची उमेदवारी घोषित करून मा. खा. राजू शेट्टी, मा. आ. उल्हास पाटील, जि. प. सदस्य अशोकराव माने, केडीसीसीचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, भाजप नेते अनिलराव यादव यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्रित येऊन यड्रावकर यांच्याविरोधात गणपतराव पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे.

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही ठरावधारकांची बैठक घेऊन मतांची गोळाबेरीज केली आहे. शिवाय, 120 ठरावधारक आपल्याबरोबर असल्याची भूमिका ना. यड्रावकर यांच्या समर्थकांनी समोर आणली आहे. शिवाय, गणपतराव पाटील यांनी गावनिहाय दौरा सुरू केला असून, प्रत्येक ठरावधारकाची भेट घेतली जात आहे. सध्या तरी ना. यड्रावकर यांच्याकडे ठरावांची संख्या जादा असल्याने कट्टर विरोधक असल्याने शेट्टी व उल्हास पाटील एकत्र येऊन दौरे करीत आहेत. यामध्ये पुढील राजकारणाची दिशाही असली, तरी केडीसीसीच्या माध्यमातून रणांगण तापवले जात आहे. त्यामुळे येणारा काळ केडीसीसीच्या माध्यमातून राजकारणाला बगल देणारा ठरणार आहे.

आगामी निवडणुकीचीही युती ?

गोकुळ दूध संघात शिरोळला एकही संचालकपद मिळाले नाही. याची उणीव भरून काढण्यासाठी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजू शेट्टी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन गणपतराव पाटील यांना बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. याबाबत ना. यड्रावकर यांच्याशी अद्याप कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. शिवाय, गणपतराव पाटील यांच्याबरोबर सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याने आगामी होत असलेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत हीच युती राहण्याचे संकेत दिले जात आहेत.

शिरोळ तालुक्यात असे आहे मतदान

पात्र संस्था-556, कृषिपत, विकास सेवा-149, प्रक्रिया संस्था-57, नागरी बँका, पतसंस्था-114, पाणीपुरवठा व इतर-236.

Back to top button