मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आर्यन शाहरुख खान, अरबाज मर्चंटसह रेव्ह पार्टी तील सर्वच आरोपी सध्या एनसीबीचा शब्दशः पाहुणचार घेताहेत. कुणालाही घरचे जेवण दिले जात नाही. एनसीबीनेच जेवणाची व्यवस्था केली आहे.
कॉर्डिलिया क्रूझवरील रेव्ह पार्टी तूून उचलून एनसीबीच्या कार्यालयात म्हणजेच ब्रिटीश कालीन एक्सचेंज बिल्डींगमध्ये आणल्यानंतर आरोपींच्या जेवणाचे काय हा प्रश्न एनसीबीला सर्वात आधी सोडवावा लागला. घरच्या जेवणाची परवानगी दिली असती तर या धनाढ्य आरोपींचे चोचले पुरवले असे आरोप एनसीबीवर झाले असते.
त्यामुळे पहिल्या रात्री एनसीबीने संपर्क साधून बेलार्ड इस्टेट लगतच्या रस्त्यावरील हॉटेलमधून जेवणाची सोय केली. पुरीभाजी, वरणभात आणि बिर्याणीचा जेवणात समावेश होता. एनसीबीच्या कार्यालयात कॅन्टीन नाही. त्यामुळे आलेले जेवण कशात वाढायचे इथपासून सुरूवात झाली. त्यासाठी मग कागदी प्लेटस् मागवण्यात आल्या.
या सर्वांना अटक केल्यानंतर त्यांची किती तास चौकशी होईल, हे निश्चित नव्हते. त्यामुळे एनसीबीच्या अधिकार्यांनी मुख्य टपाल कार्यालयाजवळील रेस्टॉरंटस्शी संपर्क साधून रात्री बिर्याणीची सोय केली. दुसर्या दिवशी एनसीबीच्या कार्यालय परिसरातच एका कोपर्यात जेवण तयार करणे सुरू करण्यात आले. एनसीबी कार्यालयातच थाटलेल्या तात्पुरत्या किचनमध्ये तयार होणारे जेवण आरोपींना दिले जात आहे.
आरोपी मुलांच्या कुटुंबियांनी मंगळवारी त्यांच्यासाठी जेवण आणि कपडे आणले. एका आरोपीचे नातेवाईकांनी मॅकडॉनल्डचा बर्गरदेखील आणला मात्र पोलिसांनी त्यांना अडवले. हा बर्गर आरोपीपर्यंत जाऊ दिला नाही.