IPL : दोन आयपीएल संघांचे मालक पँडोरा पेपर्समध्ये | पुढारी

IPL : दोन आयपीएल संघांचे मालक पँडोरा पेपर्समध्ये

लंडन/नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसंस्था : (IPL) पँडोरा पेपर्समध्ये राजस्थान रॉयल्स या संघाची मालकी हक्क असलेली फ्रँचायजी रॉयल मस्टीस्फोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि किंग्स इलेव्हन पंजाबची मालकी हक्क असलेली फ्रँचायजी केपीएच ड्रीम क्रीकेट प्रायव्हेट लिमिटेड या दोन संस्थांची नावे समोर आली आहेत.

आयसीआयजे अर्थात इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टीगेटीव्ह जर्नालीस्ट्स या संस्थेने जगभरातील अनेक बड्या हस्तींच्या काळ्या पैशांची माहिती उघड केली. पनामानीयन कॉर्पोरेट सर्व्हीसेस फर्म अ‍ॅलेमन, कॉर्डेरो, गलिंडो आणि ली ट्रस्ट लिमिटेड या संस्थांनी ब्रिटीश व्हर्जिन बेट येथे एका संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आयपीएल संघांच्या मालकांसोबत अंशतः भागिदारी केली.

यात काही ब्रिटीश नागरिकत्व असलेल्या भारतीयांचाही समावेश असून या भारतीयांचा आयपीएलचा संस्थापक ललित मोदी याच्याशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. ललित मोदीने आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये गुंतवणूक केल्याचे उघड झाले आहे. (IPL)

ललित मोदीशी संबंधित भारतीय

किंग्स इलेव्हन पंजाब या संघाशी संबंधित ललीत मोदीची सावत्र मुलगी करीमाचा पती आणि डाबर या प्रसिद्ध कंपनीचे संस्थापक बर्मन कुटुंबियांच्या पाचव्या पिढीतील वंशज गौरव बर्मन तसेच राजस्थान रॉयल या संघाशी संबंधित नायझेरीयातील भारतीय व्यापारी सुरेश चेल्लाराम यांची नावे पँडोरा पेपर्समधून उघड झाली आहेत. सुरेश चेल्लाराम हा ललित मोदीची दिवंगत पत्नी मिनल हीच्या बहिणीचा पती आहे.

गौरव बर्मन यांनी बंत्रा इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला 2 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले होते. बंत्रा इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीची मॉरिशीयन उपकंपनी असलेल्या कोलवे इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या कंपनीच्या भागधारकांना कर्ज देण्याचा उद्देश कर्ज देण्यामागे होता. कोलवे इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ही कंपनी कींग्स इलेव्हन पंजाब या आयपीएल संघाची मालकी असलेल्या केपीएच ड्रीम क्रीकेट या संस्थेची भागधारक आहे.

केपीएच ड्रीम क्रीकेटच्या 2008-09 च्या वित्तीय विवरणपत्रानुसार कोलवे इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या कंपनीचे तब्बल 4,47,700 समभाग होते. एकूण 5.11 कोटी रुपयांचे समभाग कंपनीकडे होते.

केपीएच ड्रीम क्रीकेट या फ्रॅँचायजीची बीसीसीआय आणि सक्तवसुली संचालनालयाने कसून चौकशी केली होती. त्यानंतर बीसीसीआयने या फ्रँचायजीवर बंदी घातली होती. त्यानंतर बर्मन यांनी न्यायालयात धाव घेतली होती. निकाल केपीएच ड्रीम क्रीकेटच्या बाजूने लागल्यानंतर ही फ्रॅँचायजी पुन्हा उभी केल्याचे गौरव बर्मन यांनी म्हटले आहे.

निवृत्त ले.जनरल लुम्बा यांचीही सेशल्समध्ये कंपनी

मुंबई : लष्कराचे निवृत्त ले. जनरल राकेश कुमार लूम्बा यांनी मुलगा राहूलच्या भागीदारीत सेशल्स बेटांवर रारिंत पार्टनर्स लि. या नावाने कंपनी स्थापन केल्याची माहिती या पेपर्समधून उघड झाली आहे. लुम्बा भारतीय लष्कराच्या गुप्‍तचर खात्याचे महासंचालक राहिले आहेत. 2016 मध्ये त्यांनी 1 दशलक्ष डॉलर्सची प्राथमिक गुंतवणूक करून सेशेल्समध्ये ही कंपनी उघडली. नवी दिल्‍लीतील अंनत घनशाम यांच्या नावे 34 तर लुम्बा पितापुत्रांकडे प्रत्येकी 33 टक्के शेअर्स आहेत.

Back to top button