हरित दांडी यात्रेतून तळजाई टेकडी वाचविण्याचा दिला संदेश

हरित दांडी यात्रेतून तळजाई टेकडी वाचविण्याचा दिला संदेश
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा:  महात्‍मा गांधी जयंती निमित्त माय अर्थ फांउडेशन आणि पर्यावरणप्रेमींतर्फे तळजाई टेकडीवर हरित दांडी यात्रा काढण्यात आली. महात्‍मा गांधी जयंती निमित्त गांधीजींच्या वेशभूषेत आणि प्राणी, पक्षी, आणि झाडांच्या प्रतिकृतीत ही प्रबोधनात्मक हरित दांडी यात्रा काढण्यात आली.

तळजाई टेकडी ही मुळातच जैवविविधतेचे उद्यान म्हणून पर्यावरण अहवालात समाविष्ट आहे. असे असूनसुद्धा केवळ विकासाच्या नावावर येथे प्रस्तावित जैवविविधता वसुंधरा प्रकल्प होणार  आहे.

येथील प्रस्तावित बांधकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार व जमीन सपाटीकरण होणार आहे.

अनेक प्राणी, पक्षी यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणार आहे. या प्रकल्पास निसर्गप्रेमी विरोध दर्शवित आहेत.

यावेळी माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, जैवविविधता अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर, महा एनजीओचे मुकुंद शिंदे, इन्वार्मेंट क्लब ऑफ इंडियाचे ललित राठी, जिवित नदी संस्थेच्या स्वाती डुबे, प्राणी सेवा संस्थेचे अ‍ॅड. अमित शहा, सोमनाथ पाटील, विजय जोरी, श्रीकांत मेमाणे, सुशील बोबडे, राज सिंग उपस्थित होते.

पर्यावरणप्रेमींसह नागरिकांचाही कृत्रिम प्रकल्पाला विरोध

गांधी जयंती निमित्त माय अर्थ फांउडेशन आणि पर्यावरणप्रेमींतर्फे तळजाई टेकडीवर 'हरित दांडी यात्रा' काढण्यात आली.
गांधी जयंती निमित्त माय अर्थ फांउडेशन आणि पर्यावरणप्रेमींतर्फे तळजाई टेकडीवर 'हरित दांडी यात्रा' काढण्यात आली.

पुण्यातील ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळजाई टेकडीवर ११० एकर जागेत विकासाच्या नावावर तब्बल १२० कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचे जंगल करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे.

तळजाई टेकडी नष्ट झाली, तर कालांतराने शहराचा श्वास गुदमरेल.

सामान्य जनता, पर्यावरणप्रेमी आणि तिथेच फिरायला येणाऱ्या नागरिकांचाही या कृत्रिम प्रकल्पाला विरोध आहे.

माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत म्हणाले की, विकासाच्या नावावर असेच सिमेंट कॉंक्रीटीकरण होत राहिले तर भविष्यात आपल्याला फक्त उद्यानांच्या सिमाभिंतीवर पक्षी आणि प्राण्यांचे चित्रे दिसतील.

येथे होणाऱ्या सिमेंटच्या जंगलामुळे निसर्ग, पक्षी, प्राणी सगळ्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहेत.

त्यामुळे या टेकडीवर कृत्रिम जैवविविधता उभारण्याची गरज काय आहे? येथील जैवविविधता नैसर्गिकदृष्ट्या जशी आहे तशी राहावी, असे आम्हा पर्यावणप्रेमींना वाटत आहे.

सार्वजनिक ठिकाणी एखादे बांधकाम किंवा प्रकल्प झाले तर त्याची सुरक्षा व्यवस्था योगायोगाने आलीच, सुरक्षा व्यवस्था आली की सामान्य नागरिकांच्या मुक्तसंचार करण्यावर निर्बंध येणारच. त्यामुळे भविष्यात येथे पैसे देऊन याठिकाणी प्रवेश मिळवावा लागेल की काय अशी स्थिती निर्माण करण्याचा कुटील डाव राजकारण्यांचा आणि प्रशासनाचा दिसत आहे, असेही घरत म्‍हणाले.

जैवविविधता अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर म्हणाले की, आधीच तळजाईचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यातच संपूर्ण शहराला नैसर्गिक ऑक्सिजन पुरवठा करणारी तळजाई टेकडी ही पुणेकरांची शेवटची आशा आहे.

याठिकाणी अनेक स्थानिक दुर्मिळ पक्षी आणि अनेक वृक्षांच्या प्रजाती आहेत.

त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करायचे सोडून प्रशासन विकास प्रकल्पांना वेगवेगळी गोंडस नावे देऊन प्राणी, पक्षी, झाडे यांच्या मुळावर उठले आहे, असेही पुणेकर म्‍हणाले.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news