Black pepper : शेतकर्‍यांना आधार काळी मिरीचा | पुढारी

Black pepper : शेतकर्‍यांना आधार काळी मिरीचा

काळ्या मिरीची लागवड कशी करावी? - शेतीविषयक लेख : भूमिपूत्र, शेतीविषयक विशेष लेख

Black pepper: मसाल्यात येणारा महत्त्वाचा पदार्थ म्हणून काळी मिरीला ओळखले जाते. या पिकाच्या लागवडीसाठी आधारझाडांची आवश्यकता असते. त्यासाठी नारळी पोफळीसारख्या झाडांचा वापर करता येईल. याचे कारण ही झाडे ज्या हवामानात वाढतात, त्या हवामानात मिरीचे पिक चांगले येते. मिरीच्या लागवडीतून शेतकर्‍यांना चांगला आर्थिक फायदाही होतो. मात्र, त्याची लागवड करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

काळी मिरीला (Black pepper) मसाले पिकांचा राजा असे संबोधले जाते. भारतात तयार होणार्‍या काळी मिरीस चांगला वास आणि उत्कृष्ट दर्जा असल्यामुळे जागतिक काळी मिरीच्या ९० टक्के निर्यात एकट्या भारतातून होते. तसेच भारताला विविध मसाले पिकांपासून मिळणार्‍या एकूण परकीय चलनापैकी ७० टक्के परकीय चलन एकट्या काळी मिरीपासून मिळते.

भारतात उत्पादन होणार्‍या एकूण काळी मिरीपैकी (Black pepper) ९८ टक्के उत्पादन एकट्या केरळ राज्यात होते. त्या खालोखाल कर्नाटक आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील कोकण विभागात तुरळक मिरी लागवड आढळते.

कोकण किनारपट्टीतील हवामान या पिकाच्या लागवडीस अनुकूल असल्याने आणि काळी मिरीच्या वेलास आधाराची आवश्यकता असल्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या नारळ-सुपारी झाडांवर वेल चढवून मिरी लागवड करता येते. त्यामुळे घरातील सांडपाण्याचा चांगला उपयोगही केला जातो.

घरातील काळी मिरीची गरज भागवून काही प्रमाणात बाजारातही काळी मिरी विकता येईल आणि त्यातून आर्थिक फायदासुद्धा होईल.
उष्ण, दमट आणि सम हवामान या पिकाला अनुकूल आहे. कडक उन्हाळा किंवा अति थंड हवेत हे पीक येत नाही. हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास हवा वेलीची वाढ चांगली होऊन भरपूर पीक मिळते. मध्यम ते भारी जमीन तसेच पाण्याच्या निचरा होणारी जमीन या पिकास मानवते. थोडक्यात ज्या हवामानात नारळ, सुपारी यासारख्या फळझाडांची लागवड होते किंवा होऊ शकते तेथे मिरीची लागवड अगदी सहजरीत्या करता येते.

मसाल्याच्या इतर पिकांप्रमाणे या पिकास सावलीची आवश्यकता असते. मिरीची (Black pepper) लागवड परसबागेतील आंबा, फणस यांसारख्या झाडांवर; स्वतंत्ररीत्या पांगार्‍यावर तसेच नारळ, सुपारीच्या बागांमध्ये प्रत्येक झाडांवर दोन वेल चढवून करता येते. यासाठी प्रथम आधाराच्या झाडापासून ३० सेमी. अंतरावर ४५४५४५ से.मी. आकाराचे खड्डे पूर्व आणि उत्तर दिशेला खोदावेत आणि ते चांगली माती २ ते ३ घमेली कंपोस्ट किंवा शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट किंवा हाडांचा चुरा तसेच ५० ग्रॅम बी.एच.सी. पावडर यांच्या मिश्रणाने भरुन ठेवावेत.

स्वतंत्ररीत्या पांगार्‍यावर मिरी लागवड करावयाची असल्यास मिरीवेल लागवड करण्यापूर्वी एक वर्ष अगोदर पांगार्‍यात खुंटाची लागवड करावी लागते. अशावेळी योग्य जमिनीची निवड केल्यानंतर ३३ मीटर अंतरावर ६०६०६० सें.मी. आकाराचे खड्डे घेऊन ते खड्डे चांगली माती २ ते ३ घमेले, शेणखत किंवा कंपोस्ट आणि एक किलो सुपर फॉस्फेटने भरून घ्यावेत. अशा खड्ड्यांमध्ये १.५ ते २ मीटर खोलीच्या पांगार्‍याच्या खुंटाची लागवड करावी.

ज्यावेळी सुपारीमध्ये आंतरपीक घ्यावयाचे असेल त्यावेळी सुपारीच्या दोन झाडांमधील अंतर २.७ ते ३.३ मीटर असावयास पाहिजे. मात्र, घट्ट लागवड केलेल्या सुपारीच्या झाडांमध्ये मिरीची आंतरपीक सरसकट सर्व झाडावर घेता येणार नाही. सुपारीची घट्ट लागवड असल्यास फार सावलीमध्ये मिरीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. अशा वेळी बागेच्या चोहीकडेच्या फक्त दोन रांगांतील सुपारीच्या झाडांवर मिरीचे वेल चढवावेत.

लागवड करताना केलेल्या तयार केलेल्या खड्ड्यात मधोमध मुळ्या असलेली मिरीची रोपे लावावीत. वेल आधाराच्या झाडावर चढण्यासाठी वेलास आधार द्यावा.काही मिरीचे लहान वेल आधाराच्या झाडावर चढेपर्यंत अधूनमधून त्यांना आधार देणे आणि झाडावर चढण्यासाठी दोरीच्या साहाय्याने बांधणे जरूरीचे असते. वेल ४ ते ५ मीटरहून जास्त वाढू देऊ नयेत. आधाराच्या पांगार्‍याच्या फांद्या काही प्रमाणात कापून सावली योग्य प्रमाणात ठेवावी. मिरीच्या वेलांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ४ ते ६ दिवसांनी पाणी घालावे.

तीन वर्षांपासून पुढे प्रत्येक वेलास २० किलो शेणखत/कंपोस्ट ३०० ग्रॅम युरीया २५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटेशन आणि १ किलो सुपर फॉस्फेट द्यावे. ही खताची मात्रा दोन समान हप्त्यात द्यावी. ही खते वेलापासून ३० सें.मी. अंतरावर चर खणून त्यामध्ये द्यावीत. हिरव्या घडातील एक दोन दाण्यांचा रंग तांबडा-लाल होताच घड तोडावेत. हिरव्या मिरीपासून काळी मिरी तयार करण्यासाठी दाणे बांबूच्या करडीत गोळा करावेत किंवा पातळ फडक्यात गुंडाळावेत. त्यानंतर एक स्वतंत्र भांड्यात पाणी उकळत ठेवावे.

पाण्याला उकळ्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर ती करंडी अगर फडक्यात गुंडाळलेली मिरी त्या उकळत्या पाण्यात बुडवून काढावी. अशा रीतीने उकळत्या पाण्यातून बुडवून काढलेली मिरी उन्हामध्ये चटई अगर स्वच्छ फडका अंथरून त्यावर वाळत ठेवावी. साधारणपणे ७ ते १० दिवस उन्हामध्ये वाळवावी. म्हणजे काळी कुळकुळीत न सुरकुतलेली उत्तम प्रतीची काळी मिरी तयार होईल. परंतु हिरवी मिरी उकळत्या पाण्यात न बुडवता तशीच वाळवली तर ती चांगल्या प्रकारे काळ्या रंगाची होत नाही.

त्यामध्ये काही दाणे भुरकट, तपकिरी रंगाचे होतात आणि त्यामुळे भेसळ असल्याच्या भास होतो. अशा मालाला बाजारभाव कमी मिळतो. म्हणूनच ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. नंतर चांगली वाळलेली काळी मिरी काचेच्या बरणीत अगर घट्ट झाकण असलेल्या भांड्यात ठेवून झाकण घट्ट लावावे. काळी मिरीच्या दाण्यात १२ टक्क्यांपेक्षाही जास्त ओलावा असता कामा नये म्हणजे ती साठवण्याच्या कालावधीत चांगली राहू शकते.
मिरीच्या पिकांवर जास्त हानिकारक कीड आणि रोग आढळून येत नाही. परंतु, पोलभुंगे मिरीची फळे दाणे हिरवी असताना त्यातील गर खाऊन मिरीचे दाणे पोकळ बनवून नुकसान करतात. या किडीच्या बंदोबस्तासाठी मॅलेथियान किंवा कार्बरिल औषधांचा फवारा वेली आणि फळांवर द्यावा.

वेलाच्या खालील जमीन खणून घेतल्यास या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.काळी मिरीची रोपे शेतकर्‍यांना क्षेत्र विस्तार आणि आंतरपीक कार्यक्रमासाठी ५० टक्के अनुदानावर रुपये ०.७५ प्रती कलम या दराने देण्यात येतात. नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने मिरीचे अधिक उत्पन्न देणार्‍या आणि चांगली प्रत आणि गुणधर्म असलेल्या जातींचे आणि १०० कलमांचे प्रात्यक्षिक प्लॉट स्थापन करण्यासाठी शेतकर्‍यांना तीन वर्षांपर्यंत अनुदान देण्यात येते. अशा प्रकारे मसाल्यांच्या या सम्राटाला आपल्या पिकांत वाढवून चांगले उत्पन्न घेता येईल.
-सत्यजित दुर्वेकर

हेही वाचलंत का? 

Back to top button