Mustard crop – पिकपाणी : मोहरी पीक घेताना काय काळजी घ्यावी? शेतीविषयक विशेष लेख | पुढारी

Mustard crop - पिकपाणी : मोहरी पीक घेताना काय काळजी घ्यावी? शेतीविषयक विशेष लेख

Mustard Corp : मोहरीच्या पिकाची लागवड कशी करावी? पुढारी भूमिपूत्र विशेष

अनिल विद्याधर

महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर मोहरीचे पीक (Mustard crop) घेतले जाते. बागायतीखाली हे पीक चांगले येऊ शकते. हे पीक घेताना मध्यम ते खोल चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. याची पूर्वमशागतही तेवढीच चांगली असणे आवश्यक आहे. काही ठिकाणी मिश्र पीक म्हणूनही याची लागवड केली जाते. मोहरीला (Mustard crop) नेहमीच चांगली मागणी असल्याने शेतकर्‍यांना याचे उत्पादन करून चांगला फायदा मिळवता येईल.

मोहरी भारतात मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते. त्यापासून 26.41 लाख मेट्रीक टन उत्पादन मिळते आणि सरासरी उत्पादन 681 किलो प्रति हेक्टर मिळते. हे पीक प्रामुख्याने उत्तर भारतात घेतात.

महाराष्ट्रात हे पीक अत्यल्प प्रमाणात घेतात. 1988-89 मध्ये महाराष्ट्रात या पिकाखाली 4800 हेक्टर क्षेत्र होते. त्यापासून 1200 टन उत्पादन मिळाले आणि सरासरी उत्पादन 250 किलो प्रति हेक्टर मिळाले. महाराष्ट्रात सरसो फारसे घेतले जात नाही. परंतु मोहरीचे पीक प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यात अल्प प्रमाणात घेतले जाते.

भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात भातानंतर हे पीक घेतात. इतर भागात ते गव्हांत मिश्रपीक म्हणून घेतात. बागायतीखाली हे पीक चांगले येऊ शकते.

मोहरीच्या पिकासाठी जमीन कशी असावी?

हे पीक घेताना मध्यम ते खोल चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. याची पूर्वमशागतही तेवढीच चांगली असणे आवश्यक आहे. एक नांगरणी आणि दोन वेळा वखरणी करून जमीन तयार करावी. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात घेतलेल्या प्रयोगात लवकर तयार होणारी सीता आणि मध्यम कालावधीची पुसा बोल्ड या जाती चांगले उत्पादन देत असल्याचे आढळून आले आहे.

सीता 90 ते 95 दिवसांत तयार होते आणि 10 ते 12 क्विंटल हेक्टरी उत्पादन देते. त्यामध्ये 38 टक्के तेल आहे. पुसा बोल्ड 125 ते 130 दिवसात तयार होते आणि 14 ते 15 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते. त्यामध्ये 40 टक्के तेल आहे.

पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी. पूर्व विदर्भात भातानंतर जिरायती पिकाची शक्यतो लवकर पेरणी करावी. सलग पिकासाठी 5 किलो बियाणे प्रति हेक्टर वापरावे. पुसा बोल्डचे बियाणे हेक्टरी 6 किलो वापरावे.

दोन ओळीतील अंतर 45 सें. मी. आणि ओळीतील दोन रोपांतील अंतर 15 ते 20 सें. मी. ठेवावे. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 5 ग्रॅम थायरम किंवा 3 ग्रॅम कार्बेंडेन्झीम चोळावे. 50 किलो नत्र अधिक 25 किलो स्फुरद प्रति हेक्टर पेरणीचे वेळी पेरून द्यावे.

पीक बागायती घेतल्यास पेरणीचे वेळी 30 किलो नत्र आणि 30 किलो स्फुरद द्यावे आणि पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी 30 किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. बागायती पिकास 4 ते 6 वेळा पाणी द्यावे. उगवणीनंतरचे पाणी थोडे उशिराने (3 ते 4 आठवड्यांनी) द्यावे.

पीक फुलोर्‍यात आणि शेंगा भरत असताना 15 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. 4 ते 6 ओळी गहू आणि 2 ओळी मोहरी अशा पद्धतीने पीक घेतल्यास अधिक आर्थिक फायदा मिळतो. जरूरीप्रमाणे 1 ते 2 निंदण्या (खुरपण्या) आणि दोन कोळपण्या कराव्यात आणि पीक तणविरहित ठेवावे.

मोहरीच्या पिकांवरील किडीचे व्यवस्थापन कसे करावे?

मर रोग आणि मूळकुजव्या हे रोग रोपावस्थेत येऊ नयेत म्हणून थायरम 5 ग्रॅम किंवा बाविस्टीन 3 ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळावे. पिकावर पांढरा गेरवा आणि अल्टरनेरिया करपा या रोगाच्या बंदोबस्तासाठी 0.25 टक्के मॅन्कोझेब भुकटी 1250 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावी.

भूरी रोगाच्या नियंत्रणासाठी 300 मेशची गंधक पावडर 20 किलो प्रती हेक्टर धुरळावी किंवा 1 किलो पाण्यात विरघळणारी गंधक पावडर 500 लिटर पाण्यात मिसळून फवारवी. या पिकावर मावा, काळी माशी या किडीचाही प्रादुर्भाव होतो.

या किडींच्या बंदोबस्तासाठी एन्डोसल्फान 35 टक्के प्रवाही 1 लिटर किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 500 मि.लि. 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टर फवारावे. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी 15 दिवसाच्या अंतराने करावी. शेंगा पिवळ्या पडू लागताच पीक तयार झाले असे समजावे.

काढणी शक्यतो सकाळचे वेळी करावी. जिरायतीखाली हळव्या जातीचे प्रति हेक्टरी 4-5 क्विंटल आणि निमगरव्या जातीचे 6 ते 8 क्विंटल उत्पादन मिळते. बागायतीखाली हळव्या जातीचे 10 ते 12 आणि निमगरव्या जातीचे 14 आणि 16 क्विंटल उत्पादन प्रति हेक्टर मिळते.

Back to top button