

बोरिवली (पश्चिम) मधील चिकूवाडीत ओसाड जागेत पाम- सुगंधी उद्यान उभारले आहे. बोरीवलीत पाम सुंगधी उद्यान फुलविण्याची किमया पालिकेच्या उद्यान विभागाने केली आहे. निर्मनुष्य भासणारा हा परिसर आता उद्यानांमध्ये येणाऱ्या आबाल वृद्धांमुळे फुलून जात आहे.
चिकूवाडी येथे वसंत संकूल मागील परिसरात, मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेला सुमारे ५ एकर क्षेत्रफळाचा भूखंड २०१३ मध्ये महापालिकेच्या ताब्यात आला. या जागेच्या मधोमध रस्ता जात असल्याने एका बाजूस पाम उद्यान उभारले आहे.
तर दुसऱ्या बाजूस सुगंधी उद्यान उभारण्यात आले आहे. टप्प्या-टप्प्याने रोप लागवड करीत ३ ते ४ वर्षांच्या कालावधीत दोन्ही उद्याने बहरली आहेत. पाम- सुगंधी उद्यान या दोन्ही उद्यानात भरपूर फुलझाडे प्रशासनाने लावली आहेत.
७ हजार ७९५ चौरस मीटर जागेवर फुललेल्या पाम उद्यानाचे 'गोपीनाथजी मुंडे मनोरंजन मैदान' तसेच ६ हजार ८६२ चौरस मीटर जागेवरील सुगंधी उद्यानाचे 'प्रमोदजी महाजन मनोरंजन मैदान' असे नामकरण करण्यात आले आहे.
या दोन्ही उद्यानांमध्ये असणाऱ्या रिंगवेलद्वारे उपलब्ध होणारे पाणी उद्यानातील सिंचनासाठीच पुनर्वापरात येते. परिणामी, दररोज सुमारे ३० ते ४० हजार लिटर पाण्याची बचत करण्यात येत आहे.
हेही वाचलंत का?
पाहा व्हिडिओ : जेष्ठ नागरिक स्पेशल स्टोरी : आयुष्याची सायंकाळ जगा आनंदाने