माउंट मंदा-१ शिखरावर उत्तर धारेने पहिली भारतीय मोहीम यशस्वी  | पुढारी

माउंट मंदा-१ शिखरावर उत्तर धारेने पहिली भारतीय मोहीम यशस्वी 

पुणे; पुढारी वृत्तसेवा :  माउंट मंदा-१ या ६५१० मीटर उंच व चढाईसाठी तांत्रिकदृष्टया अतिशय आव्हानात्मक शिखरावर यशस्वी चढाई करत गिरिप्रेमीच्या शिलेदारांनी भारतीय गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय रचला. धोकादायक अशा उत्तर धारेने चढाई करत गिरिप्रेमीच्या डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे व पवन हडोळे यांनी शिखरमाथा गाठला. त्यांना मिन्ग्मा शेर्पा व निम दोर्जे शेर्पा यांनी साथ दिली.

माउंट मंदा-१ शिखराच्या उत्तर धारेने यशस्वी झालेली ही पहिली भारतीय गिर्यारोहण मोहीम आहे.

एव्हरेस्ट शिखरवीर आनंद माळी यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले तर जेष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांचे मोहिमेला मार्गदर्शन लाभले.

माउंट मंदा-१ या शिखराची उंची आहे ६५१० मीटर

हिमालयातील केदारगंगा व्हॅलीत माउंट मंदा हा तीन शिखरांचा समूह आहे.

यापैकी माउंट मंदा-१ या शिखराची उंची ६५१० मीटर असून चढाईसाठी हे शिखर अत्यंत आव्हानात्मक मानले जाते.

या शिखरावर आजपर्यंत बोटावर मोजण्याइतक्या मोहिमांचे आयोजन केले गेले असून या शिखराने बहुतांश वेळा गिर्यारोहकांना हुलकावणी दिली आहे.

गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी १९८९ व १९९१ असे दोनवेळा माउंट मंदा-१ या शिखरावर मोहीम आयोजित केली होती, मात्र, दोन्ही वेळा संघाला शिखर चढाई करण्यात अपयश आले होते.

यावेळी मात्र, तब्बल ३२ वर्षांनी गिरिप्रेमीच्या नव्या दमाच्या गिर्यारोहकांनी गिर्यारोहणातील कौशल्ये पणाला लावून शिखर चढाई यशस्वी केली.

सतत होणारे हिमप्रपात, सोबतीला असणारे रॉकफॉलच्या आव्हानांना तोंड देत हिमभेगांना चुकवत, कधी कठीण बर्फाळ मार्गावरून तर कधी भुसभुशीत हिमांतून वाट काढत ७० ते ८० अंश कोनांतील हिमभिंतीचे व अतिशय तीव्र धारेचे आव्हाने स्वीकारत १८ सप्टेंबरच्या सकाळी संघाने शिखरमाथा गाठण्यात यश मिळवले.

माउंट मंदा-१ शिखराची उत्तर धार ही अत्यंत धोकादायक व आव्हानात्मक आहे.

निमुळत्या आकाराची, तीव्र उतार असलेल्या उत्तर धारेच्या मार्गाने याआधी एकही भारतीय गिर्यारोहण मोहीम यशस्वी झाली नव्हती. त्यामुळे गिरिप्रेमीच्या संघासमोर मोठे आव्हान होते.

समोर येणाऱ्या सर्व संकटांना सामोरे जात, आव्हानांना पेलत गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई करत भारतीय गिर्यारोहण इतिहासातील अतुल्य कामगिरी केली.

विशेष बाब म्हणजे, गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी रूट ओपनिंग व रोप फिक्सिंग या कठीण श्रेणीत गणल्या जाणाऱ्या कामांमध्ये देखील शेर्पांसमवेत सहभाग नोंदविला.

या मोहिमेचे मार्गदर्शक व जेष्ठ गिर्यारोहक जातीने माउंट मंदा-१च्या बेस कॅम्पवर संपूर्ण मोहिमेदरम्यान उपस्थित होते.

गिरिप्रेमीच्या १९८९ व १९९१ च्या अयशस्वी मोहिमांमध्ये सहभागी होणाऱ्या झिरपे यांच्यासाठी माउंट मंदा-१ शिखर चढाई हे एक स्वप्न होते.

या मोहिमेच्या यशस्वितेने त्यांचे तीन दशकांहून अधिक काळ उरी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाले. ते म्हणाले, “माउंट मंदा-१ हे सर्वार्थाने आव्हानात्मक शिखर आहे. हे शिखर गिर्यारोहकांचे अतीव परिक्षा पाहणारे आहे.

येथील शिखर चढाईसाठी गिर्यारोहक मानसिक व शारीरिकदृष्टया अतिशय कणखर असावा लागतो.

अशा आव्हानात्मक शिखरावर गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी मिळविलेले यश हे भारतीय गिर्यारोहण क्षेत्रातील एक सुवर्ण क्षण आहे.”

माउंट मंदा-१ या मोहिमेसोबत केदारगंगा व्हॅलीत असणारे ६०४१ मीटर उंच असलेले माउंट भ्रिगु पर्वत या शिखरावर गिरिप्रेमीच्या दुसऱ्या संघाने यशस्वी चढाई केली.

या मोहिमेत आनंद माळी, वरुण भागवत, ऋतुराज आगवणे, अंकित सोहोनी व रोहन देसाई यांनी सहभाग घेत शिखर चढाई यशस्वी केली.

विशेष म्हणजे, माउंट भ्रिगु पर्वत या शिखरावर ३० वर्षांपूर्वी पहिली यशस्वी मोहीम देखील गिरिप्रेमीने केली होती. माउंट मंदा-१ व भ्रिगु पर्वत या दोन्ही मोहिमांचे यशस्वी आयोजन करण्यामध्ये व्हाईट मॅजिक या संस्थेने मोलाचे सहकार्य केले.

जुलै महिन्यात यशस्वी झालेल्या गिरिप्रेमीचे माउंट मंदा-१ मोहिमेतील यश हे भारतीय गिर्यारोहण इतिहासातील प्रमुख क्षणांपैकी एक आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये माउंट मंदा-१ या शिखरावर भारतीय तिरंगा फडकविण्याचे भाग्य गिरिप्रेमी संस्थेला लाभले, याचा सर्वांना अतिशय अभिमान आहे.

गिरिप्रेमीच्या यशाबद्दल राष्ट्रीय स्तरांवरून कौतुक होत आहे.

१९८९ व १९९१ असे दोन वेळा माउंट मंदा-१ या शिखरावर चढाईचा प्रयत्न आम्ही केला होता.

१९८९ च्या मोहिमेचा मी नेता होतो. या दोन्ही वेळेस आम्हाला अपयश आले, मात्र, या मोहिमांनी गिरिप्रेमीच्या गिर्यारोहण प्रवासाचा पाय रचला.

माउंट मंदा-१ या शिखरावरील चढाई ही माउंट एव्हरेस्ट किंवा माउंट कांचनजुंगा या शिखरांवरील चढाण्याइतके कठीण आहे.

लहरी हवामान, सतत होणारे हिमप्रपात व रॉकफॉल, हिम भेगांचा धोका व सोबतीला अतिशय तीव्र व निमुळती धार ज्यावरून मार्गाक्रमण करणे अतिशय कठीण आहे. मात्र, गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी आपली सर्व कौशल्ये पणाला लावून शिखर चढाई यशस्वी केली याचा अतीव आनंद आहे.

माउंट मंदा-१ या शिखरावरील यशस्वी मोहीम भारतीय गिर्यारोहण प्रवासाला कलाटणी देणारी घटना आहे. या मोहिमेच्या यशस्वितेमुळे भारतीय हिमालयातील आव्हानात्मक शिखरांवर चढाई करण्याचे बळ गिर्यारोहकांना मिळेल. -उमेश झिरपे (जेष्ठ गिर्यारोहक)

हेही वाचलं का? 

Back to top button