पुणे, पुढारी वृत्तसेवा : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह बैठकीत झालेल्या निर्णयावर बोलण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नकार दिला. अजित पवार म्हणाले की, "माझ्याकडे मोकळा वेळ नाही, कोणी काहीपण बोलतील त्याच्यावर मी कशाला बोलत बसू. भरपूर काम आहेत मला, मी भला, माझी कामे भली", असे बोलत अजित पवार पत्रकारांशी बोलणे टाळले.
वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) संचालक मंडळाची बैठक संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.२१) सकाळी झाली. बैठकीस व्हीएसआयचे संचालक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार रोहित पवार, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, विशेष कार्यअधिकारी संभाजी कडू पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
बैठकीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार लगेचच गाडीत बसून निघून गेले. त्यामुळे बैठकीनंतर उपस्थितांमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांना पत्रकारांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपाबाबत विचारणा केली होती. पत्रकारांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना प्रश्न विचारल्यावर ते बोलण्यास तयार झाले होते, मात्र , अजित पवार यांनी त्यांना चला जयंतराव, म्हणताच त्यांनीही काहीच न बोलता गाडीत बसणे पसंत केले.
त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही दादा नाही बोलले तर मी काय सांगणार? असे म्हणून पत्रकारांना टाळले. सहकार मंत्री बाळासाहेब पाटीलआणि आमदार रोहित पवार यांनीही बोलणे टाळत गाडीत बसणे पसंत केले. एकूणच राजकीय अथवा कोणत्याच विषयावर बोलायचेच नाही असे ठरवूनच सर्व मंत्री मुंबईकडे पुन्हा रवाना झाले.