साखर आयुक्त गायकवाड यांना काळे फासण्याचा स्वाभिमानीचा इशारा | पुढारी

साखर आयुक्त गायकवाड यांना काळे फासण्याचा स्वाभिमानीचा इशारा

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी उसाची एफआरपी तीन टप्प्यांत घ्यावी असे वक्तव्य केले. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. तीन टप्यांतील एफआरपी अमान्य असून साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे, वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिला आहे.
यावेळी भागवत जाधव यांनी आयुक्त गायकवाड यांच्या वाक्याचा समाचार घेत म्हणाले, दोन वर्षांपासून पूरपरिस्थिती, कोरोना महामारीने शेतकरी कोलमडून पडला आहे.
रासायनिक खते, कृषी औषधांचे दर गगनाला भिडले आहेत. शेती न परवडणारी झाली आहे.
अल्पभूधारक शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. अशात आयुक्तानी असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे जाधव म्हणाले.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपीचा कायदा लागू करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढली.
या कायद्याबाबत संसदेत पाठपुरावा करत संसदेत संमत करण्यात आला.
सध्या बाजारपेठेत साखरेचा भाव प्रतिक्विंटल ३ हजार ५०० ते ४ हजारांच्या घरात आहे.
उसापासून इथेनॉल, लिकर, स्पिरीट, बगॅस, वीजनिर्मिती आदीतून मिळणाऱ्या पैश्याचा हिशोबच शेतकऱ्यांना दाखविला जात नाही.
साखर सम्राट, आणि त्यांचे बगलबच्चे मोठे होत आहेत.
शेतकऱ्यांनी आता तीन टप्प्यांत एफआरपी घ्यावी; यामुळे कारखान्याचे प्रतिटन २०० ते ३०० रुपये व्याज वाचेल असे वक्तव्य साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.
त्यांनी साखर कारखान्यादारांशी हात मिळवणी केली आहे का? सोसायटीचे कर्ज, पीक कर्ज मुदतीच्या आत भरल्यास त्यांना व्याजमध्ये सवलत मिळते.
ऊस बिलाचे तुकडे झाल्यास सोसायटी, बँकांची कर्जे भागवणे मुश्किल होईल. शेतकऱ्यांची कुटुंबे देशोधडीला लागतील. साखर आयक्तांनी याचा विचार करावा, असा सवाल जाधव आणि खराडे यांनी उपस्थित केला आहे.

एक एकर ऊस करा…

गायकवाड हे एसीमध्ये बसून उसाचे गणित मांडत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि एक एकर शेती करावी. त्या पैशातूनच त्यांनी प्रपंच्या चालवावा; म्हणजे शेतकऱ्यांच्या संसाराचा गाडा कसा चालतो हे त्यांना समजेल. गायकवाड यांच्या विधानामुळे शेतकऱ्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. यावर त्यांनी लवकरच निर्णय घ्या अन्यथा. त्यांना काळे फासल्याशिवाय राहणार नाही.
भागवत जाधव, वाळवा तालुकाध्यक्ष स्वाभिमानी पक्ष

Back to top button