गणेशोत्सव : मोहम्मद शेख यांच्या घरी २० वर्षांपासून येतात बाप्पा! | पुढारी

गणेशोत्सव : मोहम्मद शेख यांच्या घरी २० वर्षांपासून येतात बाप्पा!

पुणे; समीर सय्यद :  पुण्‍यातील  गणेशोत्सव हा सर्वधर्मीयांचे सख्य, साहचर्य अशी वैशिष्ट्य असणारा म्‍हणून ओळखला जाताे. पुणेकरांच्या गणेशोत्सव हा सर्वधर्मीयांचा तितकाच मोलाचा सहभाग असल्याचे दिसून येते. उत्सवाला लागणार्‍या आरासच्या वस्तू विकणार्‍यांपासून ते फळ विक्रेत्यांपर्यंत आणि पुजेच्या साहित्याच्या विक्रीपासून ते सार्वजनिक उत्सवातील कार्यकर्त्यांच्या सहभागापर्यंत सर्वधर्मीय समरसून भाग घेत आहेत. शहरातील गणेश मंडळांच्या उत्सवात मुस्लिम, ख्रिश्चन व इतर धर्मीय सहभागी झाले आहेत.

बाप्पांच्या स्वागताची तयारी आठ दिवस आधीच सुरू होते. बाप्पा घरी आले, की धमालच असते. आमच्याकडे बाप्पाची चांदीची मूर्ती आहे. तिच दरवर्षी बसवली जाते. आमच्या उत्सवात परिसरातील अनेक जण सहभागी होतात. घरातील सर्वांना गणपतीची आरती तोंडपाठ आहे. त्यासाठी कोणालाही बोलवावे लागत नाही. आमचं घर छोटे आहे. कमी जागेत चांगलं कसं होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. आमच्या घरातील उत्सव छोटा असला, तरी भावना मोठ्याच आहेत. अशी भावना शगुफ्ता शेख यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.

pune ganesh utasav 2021
pune ganesh utasav 2021

व्यवसायाने टेलर असलेले मोहम्मद अब्दुल सत्तार शेख आणि त्यांच्या पत्नी मुमताज मंगळवार पेठेत राहतात.

त्यांनी सन २००० पासून घरात गणपती आणायला सुरुवात केली.

या सणाची सुरुवात कशी झाली? याविषयी शेख यांची मुलगी शगुफ्ता म्हणाल्या, “२० वर्षांपूर्वी माझी आई खूप आजारी होती.

त्यावेळी डॉक्टरांनीही हात टेकले होते. आम्ही आता यापुढे काहीही करू शकत नाही. देवाकडे प्रार्थना करा. असे त्यांनी सांगितले.

त्यावेळी वडिलांनी परिसरातील मंडळाच्या गणपती बाप्पाकाडे पत्नी बरी व्हावी. असा नवस केला होता. त्यानंतर आई बरी झाली. तेव्हापासून घरात बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते.”

आमचं कुटुंब मुस्लिम असल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त करीत विरोध दर्शविला. मात्र, आई-बाबांची बाप्पावर श्रद्धा असल्याने त्यांनी विरोध झुगारला. त्यानंतर कोणीही विरोध करीत नाही.

”लहानपणापासून मी शार्दूल गणपती मंडळाचा कार्यकर्ता असून, मुस्लिम समाजातील अनेक बांधव सोबत आहेत. त्याबरोबरच घरातील सर्व सदस्यांचा पाठिंबा आहे. सर्व सदस्यांनी मला आठ ते नऊ वर्षे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. गणेश मंडळाच्या माध्यमातून समाजासाठी काम करता येते. जे-जे करता येईल, ते आमचं मंडळ करण्याचा प्रयत्न करत असते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाकाळात गरजूंना मदत करण्यात आली.”
– महंमद बागवान, सल्लागार शार्दूल गणेश मंडळ, गुरुवार पेठ

मंडई परिसरातील आप्पासाहेब मिनी मार्केट (आतार गल्ली) मध्ये आमचे पूजासाहित्य विक्रीचे दुकान गेल्या चार पिढ्यांपासून चालवले जाते. आता आमची पाचवी पिढी या व्यवसायात येऊ घातली आहे. हिंदू सणांसाठी आवश्यक असलेले साहित्य तसेच पूजेच्या साहित्याची आम्ही विक्री करतो. आमच्यासाठी राखी पौर्णिमेपासून दिवाळीपर्यंत महत्त्वाचा काळ असतो. त्यात गणेशोत्सव विशेष असतो.

– जमीर अत्तार, पूजासाहित्य विक्रेता, मंडई

पूजेसाठी आवश्यक असलेले नागेलीचे पान आता कमी प्रमाणात आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सव साजरा करता आला नाही. त्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला. यंदाही उत्सव साजरा करण्यासाठी निर्बंध आहेत. मात्र, लोक उत्सव साजरा करत आहेत. त्यामुळे बाजारपेठ फुलून गेली आहे.
बशीर हुसेन भाई, पानविक्रेते

फळांची मागणी वाढली

गणेशोत्सवामुळे फळांना मागणी वाढली आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे गणेशोत्सवावर कडक निर्बंध होते.

तसेच लोकांच्या मनात भीतीही होती, त्यामुळे लोक बाहेर पडले नाहीत. मात्र, यंदा लोक बाहेर पडत असल्याने व्यापार होत आहे. पूजेसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची विक्री होत आहे, अशी माहिती फळविक्रेते अन्वर बागवान यांनी दिली.

हेही वाचलं का ?

Back to top button