दहशतवाद्यांनी केली होती लोकलची रेकी; दिल्ली पोलिस आयुक्त मुंबईत - पुढारी

दहशतवाद्यांनी केली होती लोकलची रेकी; दिल्ली पोलिस आयुक्त मुंबईत

मुंबई, पुढारी ऑनलाईन; दिल्लीच्या विशेष पथकाने अटक केलेल्या दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. त्यानुसार त्यांचा मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा इरादा होता, अशी माहिती समोर आल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीची बैठक बोलविली आहे. या बैठकीसाठी दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना हेही बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

दिल्लीचे आयुक्त राकेश अस्थाना यांची मुंबई पोलिस आयुक्तांसोबत बैठक सुरू असून चौकशीत त्यांना मिळालेली माहिती ते मुंबईच्या आयुक्तांना देत आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संध्याकाळी पोलीस दल आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक देखील बोलावली आहे.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर भारतात विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी रेकी केली होती. ऐन सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ला करण्याची तयारी या दहशतवाद्यांनी केली होती.

याशिवाय देशात विविध ठिकाणी याआधीच स्फोटकं पाठविण्यात आलेली असल्याची शक्यताही चौकशीतून व्यक्त करण्यात आली आहे.

एका दहशतवाद्याला मुंबई-दिल्ली रेल्वेचं तिकीट काढून देणाऱ्या एजंटला एटीएसने ताब्यात घेतले आहे.

दिल्ली पोलिसांनी पकलेल्या दहशतवाद्यांची चौकशी केली असता दिल्लीसह मेट्रो शहरात बॉम्बस्फोट करण्याचा प्लॅन आखला होता.

त्यासाठी ओसामा व झिशान बॉम्ब बनविण्याची तयारी करत होते. या दोघांनी दोन आयईईडीही बनवल्याचे तपासात समोर आले आहे.

१५ दिवसांचे प्रशिक्षण

झिशान आणि ओसामा या दोघांना मस्कतमार्गे पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. तिथे त्यांना स्फोट घडवणे आणि शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

एके ४७ रायफल कशी चालवावी, हेही शिकविले होते. हे प्रशिक्षण १५ दिवसांचे होते.

एक दहशतवादी मुंबईचा टॅक्सीचालक

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया (४७) हा मुंबईतील सायन भागातील रहिवासी असून टॅक्सीचालक आहे.

त्याच्या घरी कुटुंबियांची एटीएस तसेच गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. शेख हा सायन येथील सोशननगरमधील केलाबखार परिसरात राहतो. त्याला दोन मुली आहेत.

हेही वाचा : 

Back to top button