सहा महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला केले जेरबंद
कडूस; पुढारी वृत्तसेवा : सहा महिन्यांपासून दोंदे, उढाणेस्थळ दोंदे (ता. खेड जि. पुणे) परिसरात वनविभागाला हुलकावणी देत धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला शुक्रवारी (दि.१०) पहाटे अखेर जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
गुरुवारी (दि.९) मध्य रात्री वडगाव पाटोळे येथे एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. तर दुसऱ्या दिवशी शेजारी असणाऱ्या दोंदे, उढाणेस्थळ येथील एका शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये पहाटे बिबट्याला जेरबंद झाला आहे.
या परिसरात दोन बिबटे जेरबंद झाले असले तरी तो नरभक्षकच आहे का, याबाबतचा ठाम दावा वन विभागाने अद्याप केलेला नाही. वन विभागाची पूर्ण खात्री होईपर्यंत नागरिकांनी योग्य ती दक्षता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.
दोंदे, उढाणेस्थळ येथे बिबट्याला जेरबंद करताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौधळ, वनपाल डी. डी. फापाळे, एस. पी. कासारे, वनरक्षक एस. आर. राठोड, एस. के. अरुण, अशोक वरुडे घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला बिबट निवारा केंद्र माणिकडोह येथे रवाना करण्यात येत असून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कडूस- खेड रस्त्यावर असणाऱ्या दोंदे, उढाणेस्थळ, करंडे वस्ती, पोघ्यात, ठाकरवाडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. जनावरे फस्त करण्यासोबतच नागरिकांवर हल्ला केला होता. सतत दिसणाऱ्या बिबट्याच्या वावराने या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
बिबट्याच्या भितीमुळे लोक शेतात जायला, तर महिला शेतात काम करण्यास जात नव्हत्या. आता बिबटया जेरबंद झाल्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी सध्या तरी सुटकेचा निश्वास सोडला असून परिसरात अधिक पिंजरे लावण्याची मागणी सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच सिद्धार्थ कोहिनकर, माजी उपसपंच दत्तात्रेय शितोळे, खंडू करंडे, हनुमंत कदम, शिवाजी बनकर, शरद सुकाळे, रमन मेहेत्रे, सुरज बनकर, अजय उढाणे, माऊली कदम, दत्ता दरवडे, विशाल बारणे, किरण तणपुरे यांनी केली आहे.

