पाकिस्तानी सीमेलगत हायवेवरच भारताची आपत्कालीन धावपट्टी! | पुढारी

पाकिस्तानी सीमेलगत हायवेवरच भारताची आपत्कालीन धावपट्टी!

बाडमेर (राजस्थान) ; वृत्तसंस्था : हवाईदलाच्या विमानांसाठी आपत्कालीन धावपट्टी म्हणून एनएच-925 या राष्ट्रीय महामार्गाचा वापर केला जाणार आहे. असा वापर होणार असलेला हा देशातील पहिलाच महामार्ग ठरला आहे. महामार्गावरील आपत्कालीन धावपट्टी चे उद्घाटन गुरुवारी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

गुरुवारी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-925 वरील सत्ता-गांधव पट्ट्यात हा कार्यक्रम झाला. ‘इमर्जन्सी लँडिंग फिल्ड’वर (ईएलएफ) भारतीय हवाईदलाच्या हरक्युलिस सी-130 विमानातून दोन्ही मंत्र्यांनी कृत्रिम आपत्कालीन ‘लँडिंग’ केले.

संरक्षणप्रमुख जनरल बिपीन रावत सोबत होते. महामार्गावरील ही धावपट्टी पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. महामार्गाच्या 3 कि.मी. भागावर ही धावपट्टी आहे.

2017 मध्ये पहिल्यांदा…

ऑक्टोबर 2017 मध्ये भारतीय हवाईदलाने ‘लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वे’वर विमाने उतरवून अशा महामार्गांचा वापर आपत्कालीन लँडिंगसाठी केला जाऊ शकतो, हे दाखवून दिले होते. यापुढे देशातील सर्व महामार्ग हे प्रसंगी हवाईदलाला विमाने उतरविण्यासाठी वापरता येतील असेच असावेत, असे आदेश केंद्रीय रस्ते-महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते.

देशभरात एकूण 20 आपत्कालीन धावपट्ट्या तयार बाडमेरच्या धर्तीवर देशभरात एकूण 20 आपत्कालीन धावपट्ट्या तयार केल्या जात आहेत. केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या मदतीने अनेक हेलिपॅडही तयार केले जात आहेत. संरक्षणातील पायाभूत सुविधांना बळकट करणे अगत्याचे आहे.
– राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

Back to top button