लाल, सफेद, गुलाबी चेंडूनंतर आता क्रिकेटमध्ये ‘स्मार्ट बॉल’ | पुढारी

लाल, सफेद, गुलाबी चेंडूनंतर आता क्रिकेटमध्ये ‘स्मार्ट बॉल’

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू आहे. तर, दुसरीकडे वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धा सुरू आहे. या लीगमध्ये चेंडूच्या बाबतीत वेगळा प्रयोग पहायला मिळत आहे. या लीगमध्ये विशेष पद्धतीच्या चेंडूचा वापर करण्यात येत आहे. या चेंडूला ‘स्मार्ट बॉल’ असे नाव देण्यात आले आहे. पहिल्यांदाच क्रिकेट लीगमध्ये या चेंडूचा वापर केला जात आहे.

‘स्मार्ट बॉल’ म्हणजे काय?

ऑस्ट्रेलियाची चेंडू बनविणारी कंपनी कुकाबुराने एका कंपनीसोबत हा ‘स्मार्ट बॉल’ तयार केला आहे. जगातील हा पहिला असा क्रिकेट चेंडू आहे ज्यामध्ये मायक्रोचिप लागलेली आहे. सेन्सर असलेल्या या चिपमध्ये चेंडूची गती, स्पिन आणि ताकद याची माहिती मिळते. ही माहिती खास डिझाईन केलेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्ट वॉच, मोबाईल, टॅबलेट, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप यावर पाहता येते. यामधील तंत्रज्ञानामुळे खेळात येणार्‍या काळात मोठे बदल पहायला मिळू शकतात.

कसा काम करतो ‘स्मार्ट बॉल’

चेंडू जेव्हा गोलंदाजाच्या हातातून सुटतो तेव्हा चेंडूच्या आतील सेन्सर अ‍ॅक्टिव्ह होतो. चेंडूच्या आत असलेली चिप चेंडूची गती, स्पिन आणि लागणारी ताकद याची माहिती देते. गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटल्यानंतरची गती, चेंडू बाऊन्स होण्यापूर्वीची गती आणि बाऊन्स झाल्यानंतरची गती याबद्दल माहिती मिळते. फिरकी गोलंदाजाबाबतीत देखील ही माहिती मिळते. कंपनीनुसार ‘स्मार्ट बॉल’ हा सामान्य चेंडूप्रमाणेच असतो. त्याचे वजनदेखील सामान्य कुकाबुरा बॉल इतकेच असते. चेंडू तसाच आहे; पण त्याच्या कोअरमध्ये बदल करण्यात आला आहे.

कोणत्या देशात, कोणत्या चेंडूचा होतो वापर

कुकाबुरा चेंडू ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगला देश, झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान कसोटी सामन्यांसाठी वापरतात. हा चेंडू ऑस्ट्रेलियात तयार केला जातो. इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ड्युक चेंडूचा वापर होतो. तर, भारतात होणार्‍या सामन्यांसाठी एसजी चेंडू वापरला जातो.

किती वेळात मिळणार माहिती

बॉलमध्ये लागलेली चिप एका अ‍ॅपशी लिंक असेल. अ‍ॅपवर बटन दाबताच रेकॉर्डिंग सुरू होते. गोलंदाजाने चेंडू टाकल्यास लगेच माहिती मिळते. या डेटा ब्ल्यू टुथच्या माध्यमातून जमिनीवर ठेवलेल्या राऊटरपर्यंत पोहोचतो. तेथून तो क्लाऊडवर पाठवला जातो. येथून अ‍ॅपवर सर्व माहिती दिसते. चेंडू फेकल्यानंतर शेवटची माहिती येईपर्यंत साधारणत: पाच सेकंदाचा वेळ लागतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी होणार चेंडूचा वापर

या चेंडूची अजूनही पुरेशी चाचणी झाली नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. पुढील वर्षापर्यंत आयसीसी आणि सदस्य देशांतील बोर्डामध्ये या चेंडूचा वापर केला जाईल याचा विश्वास कंपनीला आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगनंतर कंपनीचा प्रयत्न अन्य मोठ्या टी-20 लीगमध्ये या चेंडूचा वापर करण्याचा असेल.

आयसीसीचा चेंडूच्या वापराबाबत नियम नाही

चेंडूच्या वापराबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) काही विशेष दिशा-निर्देश नाहीत. सर्व देश आपल्या परिस्थितीनुसार चेंडूचा वापर करतात. ज्या देशात मालिकेचे आयोजन होते तो देश आपल्या आवडीनुसार चेंडूचा वापर करतो.

Back to top button