राणेंच्या संदर्भातील लूकआऊट नोटीस अर्ज पुणे पोलिसांकडे वर्ग | पुढारी

राणेंच्या संदर्भातील लूकआऊट नोटीस अर्ज पुणे पोलिसांकडे वर्ग

पुणे, पुढारी वृतसेवा : आर्थिक कर्ज प्रकरणी केंद्राने नितेश आणि निलम राणे यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ती नोटीस सध्या गृह विभागाकडे वर्ग करण्यात आली होती. पोलिस महासंचालकांनी तो अर्ज पुणे पोलिसांकडे वर्ग केला असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (दि. ९) पुण्यात दिली

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, केंद्रीय यंत्रणेने राणे यांच्या लुकआऊट नोटीस बाबत राज्य शासनाकडे अर्ज पाठवला आहे.  हा अर्ज पोलीस महासंचालकांनी पुणे क्राईम ब्रँच कडे वर्ग केला आहे. केंद्राचं पत्र प्राप्त झाल्यानंतर कारवाईची सुरुवात करण्यात आलेली आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पोलीस दल सक्षम करण्याच्या अनुषंगाने पोलिसांसाठी विशेष तरतूद केली आहे. यामध्ये २८ हजार १७५ रुपये एवढी मोठी तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांची घरे, पोलीस स्टेशन व इतर सोयीसाठी दरवर्षी एक कोटीची तरतूदही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलीस पदावर रुजू झालेला कर्मचारी उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा याचीही सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

११२ हेल्पलाईन सेवेत…

पोलिसांची मदत तातडीने सामान्यांना मिळावी यासाठी ‘डायल-११२’ ही योजना अमलात आणली जाणार आहे. यासाठी १५०० दुचाकी आणि १२०० इतर वाहने जीपीएस यंत्रणेसह अद्यावत असलेली वाहने देण्यात येत आहे. ही वाहने अवघ्या पंधरा मिनिटात मदतीसाठी पोहोचतील अशी सोयही करण्यात आली आहे.

महिलांसाठी शक्ती कायदा..

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यांच्यासुरक्षेसाठी राज्य सरकार शक्ती कायदा अमलात आणत आहे. जेणेकरून महिलांना या कायद्याचा आधारे मदत करण्याची सोय करण्यात आली आहे.

४५ फॉरेन्सिक लॅब 

राज्यात वाढत असलेले सायबर गुन्हे अडचणीचे ठरत आहे. यावर मात करण्यासाठी गृह विभागाने राज्यात ४५ फॉरेन्सिक लॅब तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सायबर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन ही निर्माण करण्यात येणार आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, “अनिल परब व भावना गवळी यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या आरोपाची सिद्धता  होणे बाकी आहे, तोपर्यंत मी बोलणे योग्य नाही.” जरंडेश्वर कारखाना व्यवहाराबाबत ते म्हणाले, “राज्य बँकेने कर्ज वसुलीसाठी जास्त बिडींग लावणाऱ्याकडे ती मालमत्ता सोपवली असावी असे मला वाटते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही. परमवीर सिंग यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींची चौकशी स्वतंत्र यंत्रणेमार्फत सुरू असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्यानंतरच सरकार योग्य त्या कारवाईचा निर्णय घेईल.”

नक्षली, सामाजिक प्रश्न

सध्या संवेदनशील विषय कोणते या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, “नक्षली चळवळ व सामाजिक प्रश्नावरून असंतोष राज्यात मराठा क्रांती मोर्चाने काढलेले मोर्चे आणि त्यानंतर दाखल झालेले खटले यापैकी १०९ खटले मागे घेण्यात आले आहे. उर्वरित  खटल्याविषयी न्यायालयात विनंती अर्ज करण्यात आला असून तेही पुणे लवकरच मागे परत घेतले जातील”, असेही ते म्हणाले.

१५ दिवसांत ३ घटना

महिलांवरील अत्याचाराच्या मागील पंधरा दिवसांत तीन घटना घडल्या आहेत. अशा घटना घडणे योग्य नाही. अशा घटना घडण्याआधीच त्याचा संदेश देणारी ‘ऑटोमेशन यंत्र’ यंत्रणा येत्या दोन महिन्यांत वाहनावर बसवण्यात येणार आहे. जेणेकरून वाहनातून जा महिलेस शंकाही आल्यास तिच्या हालचालीवरून ते वाहन टिपून पोलीस कारवाई केली जाईल अशी सोय करण्यात आली आहे.

Back to top button