बारामती शहरात लूटमार करणारे तिघे जेरबंद | पुढारी

बारामती शहरात लूटमार करणारे तिघे जेरबंद

बारामती, पुढारी वृत्तसेवा: नवरात्रानिमित्त माळावरची देवी मंदिराकडे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना अडवून लुटमार करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली. बुधवारी (दि. २८) तिघांकडून हा प्रकार सुरु होता. पिण्या उर्फ अमर सुनील सोनवणे, हर्षद उर्फ हर्षा राजू बागवान उर्फ काकडे आणि अमोल राजू कांबळे (रा. पोस्ट कार्यालयाजवळ, आमराई, बारामती) अशी पोलिसांनी अटक केल्यांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत माहिती दिली.

माळावरची देवीच्या दर्शनासाठी महिला, पुरुष जात असताना हे तिघे त्यांना अडवून लुटमार करत होते. उपनिरीक्षक गणेश निंबाळकर, पोलिस नाईक कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, बंडू कोठे, शेख हे साध्या वेशात रस्त्याने गस्त घालत असताना त्यांना या तिघांकडून सुरु असलेल्या कृत्याविषयी माहिती मिळाली. दोन पंचांसमक्ष पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे धारदार हत्यारे, दोर व मिरची पूड आढळून आली. त्यांनी भाविकांकूडन जबरदस्तीने काढून घेतलेले १७०० रुपयांची रक्कम मिळून आली. पोलिसांचा सुगावा लागताच त्यांचे अन्य दोन साथीदार मोटरसायकलीवर फरार होण्यात यशस्वी झाले.

या टोळीची शहरात दहशत असल्याने पैसे काढून घेतले तरी नागरिकांनी पोलिसांत तक्रारी केल्या नव्हत्या. त्यामुळे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सरकारतर्फे फिर्यादी होत या तिघांविरोधात कलम ३९९, ४०२ सह भारतीय हत्यार कायद्यानुसार फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे तपास करत आहेत.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत पिण्या व हर्षद हे त्यांच्या साथीदारांसह शहरातील हाॅटेल व्यावसायिक, व्यापारी, महाविद्यालयीन तरुणांना वारंवार त्रास देत छोट्या-मोठ्या लूट करत असल्याचे समोर आले. टी. सी. महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांमध्ये या टोळीने दहशत निर्माण केली होती.

रेकाॅर्डवरील गुन्हेगारांना गुन्ह्यांपासून परावृत्त व्हावे. ते गुन्हेगारी कारवाया करताना आढळून आल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करत कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीही अशा लोकांपासून होणाऱ्या त्रासाला घाबरू नये. पोलिसांना तात्काळ फोन, मेसेजद्वारे माहिती द्यावी. अशा प्रवृत्तींचा बिमोड केला जाईल.

– सुनील महाडीक, पोलिस निरीक्षक, बारामती शहर पोलिस ठाणे

Back to top button