पुणे: नगर रचना उपसंचालकावर ‘स्पेशल छब्बीस’ चा डाव; वारजे पोलिसांच्या प्रसंगावधानाने तोतयांनी काढला पळ | पुढारी

पुणे: नगर रचना उपसंचालकावर 'स्पेशल छब्बीस' चा डाव; वारजे पोलिसांच्या प्रसंगावधानाने तोतयांनी काढला पळ

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अक्षय कुमाचा स्पेशल छब्बीस हा हिंदी चित्रपट आपल्याला आठवत असेल. तो आणि त्याचे सहकारी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून अनेक ठिकाणी धाडी टाकत होते. गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन जप्त केलेला ऐवज घेऊन पळ काढत होते. असाच काहीसा प्रकार वारजे जकातनाका कर्वेनगर परिसरात समोर आला आहे. शुक्रवारी २४ जून रोजी भल्या सकाळी, तिघेजण आम्ही अँटी करप्शनचे पोलीस आहोत असे सांगून नगर रचना उपसंचालकाच्या घरात शिरले. त्यांचे मोबाईल काढून घेऊन कारवाईचा बहाणा केला. मात्र याची माहिती उपसंचालकाच्या मुलाने सकाळी गस्तीवर असलेल्या वारजे पोलिसांना दिली. मग काय पोलिसांची एंन्ट्री झाली अन् त्यांचा डाव फसला. गस्तीवरील महिला पोलीस उपनिरीक्षकांना आम्हाला कल्पना न देता कसे आलात, असे म्हणत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करण्याचा बहाणा करुन या तोतयाने पळ काढला.

याप्रकरणी नगर रचना विभागाच्या उपसंचालकांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साध्या वेशातील सावंत व पोलीस गणवेशातील एक पुरुष व महिला अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कर्वेनगरमधील दत्त दिगंबर कॉलनीत शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई अ‍ॅन्टी करप्शनकडून आलो असल्याचे सांगून तिघांनी नगर रचना संचालकांच्या घरात सकाळी साडे सहा वाजता प्रवेश केला. त्यातील एकाने पोलिस गणवेश परिधान केला होता. घरात प्रवेश करताच सुरुवातीला त्याने सर्वांचे मोबाईल काढून एका टेबलावर ठेवले. यानंतर 23 जून रोजी तुमच्या ऑफिसमध्ये काय झाले याची विचारणा केली. त्यांनी त्यांच्याकडील एका व्हिडिओ दाखवून त्यामध्ये एक व्यक्ती झोन दाखल्याबाबत आला होता. त्याबाबत फिर्यादीने आरोपीना माहिती दिली. त्यावर या तोतयाने तुमच्या ऑफिसमधील एकाने झोन दाखल्यासाठी आलेल्याकडे पैशांची मागणी करुन काही रक्कम घेतली आहे. तसेच तुमचे नाव देखील आले आहे.

त्यामुळे तुम्हाला त्यात अटक करुन तुमची प्रॉपर्टी जप्त करावी लागेल, असे सांगितले. हे तुम्हाला नको असेल तर 5 लाख रुपये द्यावे लागतील, असे तो तोतया अधिकारी बोलला. उपसंचालकांच्या घरात त्यांचा मुलगा आणि आणखी एक नातेवाईक राहतो. आरोपींनी त्यांच्या घरात पाहणी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी उपसंचालकांचा मुलगा घरातून खाली आला. यावेळी वारजे पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक तृप्ती पाटील या गस्तीवर होत्या. मुलाने पाटील यांना पाहिले. त्याने आमच्या घरात पोलिस आल्याचे सांगितले. पाटील यांना ऐवढ्या सकाळी पोलिस येथे कसे काय पोहचलेत हे पाहण्यासाठी तिथे गेल्या. त्यांना पाहून या तोतयाने तुम्ही आम्हाला कल्पना न देता या ठिकाणी कसे आलात, तुमच्या सिनिअर पीआयचा नंबर द्या, असे त्यांना म्हणाला. त्यांनी नंबर दिल्यावर त्यांना फोन लावण्याचा बहाणा करुन तो घराबाहेर गेला व तेथून तो पळून गेला. पाटील यांनी खूप उशीर झाला तरी तो अधिकारी वरती आला नाही यामुळे त्यांनी खाली जाऊन पाहिले असता, ते सर्व गायब झाल्याचे दिसून आले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरु असेल तर त्यात हस्तक्षेप केला जात नाही. नाही तर तुमच्यामुळे आमची कारवाई फसली, असे म्हणून संबंधित अधिकाऱ्याला दोष दिला जातो. कर्वेनगरमध्ये कारवाई सुरु असल्याचे समजल्यावर पोलीस अधिकाऱ्यांना पाठविले होते. तेव्हा हा प्रकार समोर आला अशी माहिती वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी दिली. वरिष्ठांच्या आदेशानुसार परिसरात गस्तीवर होतो. त्यावेळी त्याने आपल्यालाच तुम्ही येथे कशा आलात, असे म्हणून माझ्याकडून वरिष्ठांचा नंबर घेतला. त्यावेळी मला माझ्या अधिकार्‍यांचा फोन येत होता. पण तोही घेऊन दिला नाही. वरिष्ठांना बोलण्याचा बहाणा करुन तो घराबाहेर गेला. तेव्हा आम्ही घरातच वाट पहात होतो. काही वेळाने बाहेर येऊन पाहिल्यावर तो पळून गेल्याचे लक्षात आले, असे पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील यांनी सांगितले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पार्वे करीत आहेत.

Back to top button