हनी ट्रॅप च्या जाळ्यात एअर फोर्समधील निवृत्त अधिकारी, १० लाख रुपये लाटले | पुढारी

हनी ट्रॅप च्या जाळ्यात एअर फोर्समधील निवृत्त अधिकारी, १० लाख रुपये लाटले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पनवेल येथील व्यवसायिकाला हनी ट्रॅप मध्ये अडकवून मारहाण करत लुटल्याची घटना ताजी असतानाच, चंदननगर येथील एअरफोर्समधील एका निवृत्त अधिकार्‍याला हनी ट्रॅप मध्ये अडकवून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

विमानतळ पोलिसांकडून ५ जणांवर गुन्हा

या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यातील चौघांना अटक केली आहे.

दत्ता ऊर्फ यादव कुर्हाडे (वय ४८, रा. लवणवाडी, जुन्नर), उत्तम कान्हुजी कुर्हाडे (वय ४०) नारायण जाधव (वय ३७, रा. कैवानमळा, जुन्नर), अनिल ऊर्फ भाऊ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणातील संबंधित महिलेचा पोलिस शोध घेत आहेत.

 

फिर्यादी हे एअर फोर्समधील निवृत्त अधिकारी

या प्रकरणी चंदननगर येथील एका (५९ वर्षीय) निवृत्त एअर फोर्स अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे.ते विमाननगर येथील युनियन बँक ऑफ इंडिया येथे गेले असताना संबंधित तरुणीने त्यांना फोन केला.

त्‍यांच्‍याकडे नोकरीबाबत चौकशी केली. त्यावेळी फिर्यादी याने आपण व्यवसाय करीत असून माझ्याकडे नोकरी वगैरे नाही़ असे सांगितले.

यानंतर तिने व्हाटस अ‍ॅपवर त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांची सर्व माहिती घेऊन त्यांच्याबरोबर प्रेमाचे नाटक केले.

त्यांना १२ ऑगस्ट रोजी नारायणगाव येथे बोलावले. तेथून ती त्यांना एका ठिकाणी घेऊन गेली. त्यांच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी तेथे तिचे नातेवाईक आले. तेव्हा तिने निवृत्त एअर फोर्स अधिकाऱ्याने आपल्यावर जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचे खोटे सांगितले.

त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांच्या गळ्याला कुर्‍हाड लावून त्‍यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

प्रकरण मिटविण्यासाठी ५० लाखांची मागणी

दरम्यान, हे प्रकरण मिटविण्यासाठी फिर्यादी याच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून युनियन बँक ऑफ इंडियाचे १० लाख रुपयांचे तीन धनादेश जबरदस्तीने लिहून घेतले. यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

या प्रकारानंतर सोमवारी पुन्हा फिर्यादी यांना त्यांनी फोन करुन पैशांची मागणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

विमानतळ पोलिसांनी तातडीने कारवाई करुन पैसे घेण्यासाठी आलेल्या दोघांना सापळा रचून अटक केली.

विमानतळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवदास लहाने या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

विमानतळ पोलिसांनी तातडीने कारवाई करुन पैसे घेण्यासाठी आलेल्या चौघांना सापळा रचून अटक केली.

फरार झालेल्‍या महिलेच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव  यांनी दिली.

हेही वाचलं का ? 

पाहा व्हिडिओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

Back to top button