मुंबई मार्केटसाठी ‘गोकुळ’चे २३३ कोटी बजेट | पुढारी

मुंबई मार्केटसाठी ‘गोकुळ’चे २३३ कोटी बजेट

कोल्हापूर : संतोष पाटील : मुंबई ची दुधाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी नव्या संचालक मंडळाने कंबर कसली आहे. वाशी येथील प्लॅन्टसाठी 29 कोटी आणि सिडकोकडून मिळणार्‍या पनवेल येथील जागा विकसित करून प्लॅन्ट सुरू करण्यासाठी 204 कोटी असे एकूण 233 कोटी रुपयांचे बिग बजेट नियोजन संचालक मंडळाने आखले आहे. इतका मोठा खर्च एकदम न करता टप्प्याटप्प्याने नियोजन करावे, असा सूर विरोधी आघाडीने लावला आहे.

मागील तीन महिन्यांत गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यापासून अंतर्गत बदलाचे वारे वाहू लागले आहे. नव्या सत्ताधार्‍यांंनी पहिल्या टप्प्यात ठेकेदारांची साखळी मोडली. मुंबई दूध वाहतूक ठेक्याचे दर कमी करण्यात आले. दरम्यान, पुणे आणि मुंबईतील वितरण साखळी कायम ठेवत पॅकिंग यंत्रणा बदलण्यात आली. पुण्यातील पॅकिंग ठेका बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर मुंबईतील ठेका महानंदला देण्यात आला आहे.

गोकुळ दुधाला मुंबईमध्ये मोठी मागणी आहे. मुंबईत प्रकल्पासाठी राज्य शासनाकडे संचालक मंडळाने जागेची मागणी केली होती. त्यानुसार पनवेल एमआयडीसी येथील जागा देण्याचे निश्‍चित झाले आहे. या जागेवर प्रकल्प बांधणीसाठी 110 कोटी, तर यंत्र सामग्रीसाठी 90 लाख, इतर परवान्यांसह सुमारे 205 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे.

गोकुळ 74 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, उर्वरित रकमेचे साडेपाच टक्के व्याजदराने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून (एनडीडीबी) कर्ज घेतले जाईल. बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एनडीडीबीच्या संचालकांनी उपस्थित राहून प्रकल्पाची तांत्रिक माहिती घेतली.

घाई नको : विरोधकांची मागणी

वार्षिक 2500 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या गोकुळचा निव्वळ नफा फक्‍त सात कोटी 61 लाख रुपये इतकाच आहे. मुंबई मार्केटमध्ये मागणी असल्याने गोकुळचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. प्रकल्प सुरू करणार होता तर महानंदला पॅकिंग ठेका देण्याची का घाई केली? विस्तारीकरण करताना टप्प्या-टप्प्याने व्हावे, एकाच वेळी 250 कोटी खर्चाचा प्रकल्प उभारणे धोक्याचे ठरू शकते, अशी शंका विरोधी आघाडीने उपस्थित केली आहे.

नियोजनाचा अभाव अन् 100 कोटींचा प्रकल्प

एनडीडीबीकडून 80 कोटी कर्ज, स्वनिधी, उदगाव, रिर्फेजेन, राष्ट्रीय कृषी विकास योजना अनुदान आदी 100 कोटींपेक्षा अधिकची तरतूद करत मागील संचालक मंडळाने सध्याच्या 10 लाख लिटर प्रक्रिया प्रकल्पाचे 20 लाखांपर्यंत विस्तारीकरण केले. सप्टेंबर 2019 पासून विस्तारित प्रकल्प सुरू झाला आहे. 20 लाख लिटर क्षमतेसाठी जादाचे लागणारे आणखी जादा सात लाख लिटर दुधाची गरज भागविण्याच्या दृष्टीने नियोजनाचा अभाव असल्याची टीका झाली होती. कोरोना महामारी, महापूर आदींमुळे गोकुळला जादा दूध मिळविण्यात सध्या अडचणी आहेत.

Back to top button