कोल्हापूर : सागर यादव : 5 मे 1940 रोजी कोल्हापुरातून पहिल्या विमानाने टेक ऑफ केले. त्यावेळी कोल्हापूर – मुंबई विमान प्रवासाचे भाडे 32 रुपये, तर कोल्हापूर-पुणे प्रवासाचे भाडे 20 रुपये होते. राजर्षी छत्रपती शाहूंच्या लोकोपयोगी कार्याचा वारसा जपत छत्रपती राजाराम महाराज यांनी दूरदृष्टीने आधुनिक कोल्हापूरचा पाया रचला. दळणवळणातील अत्याधुनिक अशी विमानसेवा सुरू करून कोल्हापूरला जगाशी जोडले.
छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूर-बेळगाव रस्त्यावर उजळाईच्या माळावर (उदासी बुवाचा माळ) विमानतळ सुरू केले (1930 ते 35). यासाठी 170 एकर जमीन दिली होती. 5 जानेवारी 1939 रोजी कोल्हापूर विमानतळाचे उद्घाटन झाले. यानंतर स्वत: त्यांनी विमानातून फेरफटका मारला. पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या उपस्थितीत 5 मे 1940 रोजी पहिल्या विमानाने टेक ऑफ केले.
त्यावेळी कोल्हापूर – मुंबई विमान प्रवासाचे भाडे 32 रुपये, तर कोल्हापूर-पुणे प्रवासाचे भाडे 20 रुपये होते. कोल्हापूर-मुंबई परतीच्या प्रवासाचे भाडे 58 रुपये होते. सोमवार, बुधवार व शनिवार असे आठवड्यातून तीन दिवस हे विमान कोल्हापुरातून मुंबईला जात असे.
कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी इतिहासप्रेमींच्या वतीने अनेक वर्षे आंदोलन व पाठपुरावा करण्यात आला. उशिरा का होईना या मागणीला यश आले आहे.
कोल्हापूर विमानतळाचे 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ' असे नामकरण करावे यासाठीचा प्रस्ताव नागरी उड्डयन खात्याने केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविला आहे. त्यावर अंतिम निर्णय होताच छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी दूरदृष्टीने केलेल्या कार्याचा गौरव होणार आहे.