आम्लपित्ताचा त्रास, ही पथ्ये पाळा! | पुढारी

आम्लपित्ताचा त्रास, ही पथ्ये पाळा!

वैद्य विनायक खडीवाले

अलीकडील काळात आम्लपित्ताची व्याधी असणार्‍यांची संख्या वाढताना दिसत आहे. आम्लपित्ताचा त्रास सुरू असताना उलटीची भावना असेल तर लघुसुतशेखर, कामदुधा, प्रत्येकी 3/3 गोळ्या सकाळी आणि संध्याकाळी पाण्याबरोबर घेणे. तसेच दोन्ही जेवणांनंतर प्रबाळ पंचामृत 6 गोळ्या आम्लपित्तवटी 3 गोळ्या घ्याव्यात. गोरख चिंचावलेह 3 चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. वातप्रधान आम्लपित्त असेल तर शंखवटी 3/3 गोळ्या बारीक करून घ्याव्या.

शिवाय, पाचकचूर्ण किंवा हिंगाष्टकचूर्ण पाव ते अर्धा चमचा ताक किंवा गरम पाण्याबरोबर घ्यावे. पायातील ताकद कमी असेल तर दुबळेपणा आणि व्यक्‍ती कृश असेल तर शतावरीघृत दोन चमचे किंवा शतावरी कल्प दोन ते तीन चमचे 1 कप दुधाबरोबर घ्यावे. भूनिंबादि काथ दोन्ही जेवणांनंतर 4 चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावा.

कफप्रधान आम्लपित्तात जेवणानंतर प्रवाळपंचामृत 3/6 गोळ्या घ्याव्यात. आरोग्यवर्धिनी सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी तीन-तीन गोळ्या बारीक करून पाण्याबरोबर घ्याव्यात. पांडुता आणि दुबळेपणा असला तर गोरखचिंचावलेह घ्यावा. मलप्रवृत्ती चिकट असल्यास गोरखचिंचावलेह घेऊ नये. आम्लपित्ताच्या सर्व प्रकारांत त्रिफळाचूर्ण रात्री एकम चमचा अवश्य घ्यावे.

या व्याधीच्या काळात वेळेवर जेवण घेणे आवश्यक ठरते. आम्लपित्तात उलटी होत असल्यास ते वाईट. त्याकरिता शौचाला साफ होणारे ओषध देऊन पित्त बाहेर काढणे गरजेचे आहे. आम्लपित्ताचा त्रास असणार्‍यांनी दररोज थोड्या प्रमाणात जेवावे. जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळाव्यात. आहारात जिरे, धने, कोथिंबीर, आवळा, कोकम, दूध, चांगले तूप, गोड ताक, सर्व प्रकारच्या लाह्या वापराव्यात.

अतिआंबट, तिखट, खारट पदार्थ, दही, लोणचे, पापड, चहा, मसाले, व्यसने, जागरण, उन्हात हिंडणे, चिंता, बौद्धिक, आर्थिक ताण, राक्षसकाळी जेवण वर्ज्य करावे. रात्री जेवणानंतर फिरणे आवश्यक. रुग्णालयीन उपचारांमध्ये निरुहबस्ती, मनुका, ज्येष्ठमध किंवा त्रिफळा यांचा काढा घ्यावा. पित्त पडण्यासाठी ज्येष्ठमध आणि गेळफळ यांचे पाणी घ्यावे. पंचकर्मादि उपचारांमध्ये वमन (मीठ आणि गरम पाणी) लाभदायक ठरते. आम्लपित्ताचा त्रास असणार्‍या रुग्णांसाठी चिकित्सा काळ एक ते दीड महिना असावा.

निसर्गोपचारांमध्ये यासाठी भरपूर दूध, तूप, भाताच्या, ज्वारी, राजगिरा लाह्या, काळ्या मनुका, द्राक्षे यांचे सेवन लाभदायक मानले गेले आहे. आम्लपित्ताचा त्रास असणार्‍यांनी गेरूचा किंवा खडूचा तुकडा तोंडात धरावा. तात्पुरते काम भागते. आम्लपित्ताचे मूळ नाहीसे होण्याकरिता नियमित जेवण, रात्री त्रिफळाचूर्ण आणि कडक पथ्यपाणी दीर्घकाळ आवश्यक आहे.

Back to top button