भुतोंडी खिंड ते एकलगाव नयनरम्य प्रवास

भुतोंडी खिंड ते एकलगाव नयनरम्य प्रवास

राजेंद्र खोमणे

नानगाव : भुतोंडी खिंडीत उतरल्यानंतर चुकण्याची दाट शक्यता आहे कारण एकतर याठिकाणी लोकांची वर्दळ नसते तर दुसरीकडे जंगलातून पुढे जाण्यासाठी रस्ता लवकर दिसून येत नाही. जर या ठिकाणी रात्र झाली तर नक्कीच चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. खिंडीत उतरल्यावर दक्षिणेकडे एक पाऊलवाट जाते मात्र ही वाट तुम्हाला दूरच्या बाजूने बालवडकेला घेऊन जाते.तर आपण ज्या ठिकाणी खिंडीत उतरतो लगेचच समोर झाडीत डाव्या बाजूला पालापाचोळ्यांनी मळलेली वाट दिसते याच वाटेने आपण तोरण्याकडे जातो.

राजगड – तोरणा जवळपास आठ ते दहा तासांचा पायी प्रवास आहे. छोटीमोठी झाडे,चढ उतार,एखादे जंगल पार करत आपण तोरण्याकडे पोहचतो.मात्र आपणास जर रायगडकडे जायचे असल्यास आपण दोन्ही गडकोटांच्या रस्त्याच्या मधोमध बालवडकडे जाण्याची सोपी वाट धरून जाऊ शकतो. थोड्याफार टेकड्या पार करत आपण बालवडमध्ये पोहचतो तर पुढे पासली पर्यंत पक्का रस्ता असून आपण सहज तिथपर्यंत पोहचू शकतो. मात्र पासलीच्या पुढे प्रवास करताना पुन्हा एकदा चढ उतारांच्या वाटा दमछाक करतात. पासली आणी कुसारपेठच्या मधोमध उंच पठारावरून उत्तरेकडे पाहिल्यास सह्याद्रीच्या रांगेत दुरवर तोरणा व राजगड किल्ल्याचे विहंगम दृष्य नजरेत पडते.

पुढे तिन चार डोंगर चढ पार करत आपण कुसारपेट गावात पोहचतो. निसर्गाच्या सानिध्यात आणि सह्याद्रीच्या रांगेत वसलेले हे छोटेखानी गाव आहे.गावात जिल्हा परिषदेची शाळा असुन गोपालन करत ही मंडळी आपला उदरनिर्वाह करतात . कुसारपेट पासुन आपण पुढे एकलगाव व सिंगापूरला जावू शकतो.ही दोन गावे पुणे व रायगड जिल्ह्यांंच्या सिमेवर आहेत.या दोन्ही गावांमधून आपण रायगड जिल्ह्यातील दापोली गावात उतरतो.एकलगावातून आग्याची नाळ तर सिंगापूर मधून सिंगापूर नाळ या दोन्ही नाळेतून अवघड असा प्रवास करत दोपोली पर्यंत पोहचता येते.

कुसारपेट आणि एकलगावच्या मध्यभागी पठारावरून दुरवर आपणास लिंगाणा व रायगड किल्ला नजरेत पडतो.सह्याद्रीच्या रांगेतील लिंगाणा किल्याचा सुळका आणि दुरवर रायगड किल्याची भव्यता दिसून येते.निसर्गाने नटलेल्या सह्याद्रीच्या रांगेतील हे महत्वाचे दोन किल्ले शिवप्रेमींना कायमच खुणावत असतात.त्यामुळे एकलगाव, सिंगापूर मधून मोहरी गावातून बरेचसे शिवप्रेमी अवर्जून लिंगाण्याचा थरार अनुभवायला जात असतात.रायगडकडे जाण्यासाठी एकलगाव आणि सिंगापूरची नाळेतून आपण रायगडकडे जाऊ शकतो.
(क्रमशः)

शवछत्रपतींच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि कायमची राजधानी रायगड हा 125 किलोमीटरचा प्रवास प्रत्येक शिवप्रेमीला पर्वणीच ठरेल असा आहे. सह्याद्रीचे डोंगर, दर्‍या, जंगल, पाऊलवाट तुडवत होणारा हा प्रवास स्वर्गसुखाचा आनंद देणारा नयनरम्य असा आहे. या प्रवासातील चित्तथरारक प्रसंग, इतिहासाच्या पाऊलखुणा दाखविणार्‍या वास्तू, नैसर्गिक वैशिष्ट्ये यासंबंधीची मालिका…

 हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news