इंदापुरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत | पुढारी

इंदापुरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

बावडा : पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यात पाऊस लांबल्याने शेतकरी वर्गात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाअभावी तालुक्यात खरीप पेरण्यांना अद्यापी प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग खरीप पेरण्यासाठी दमदार स्वरूपाच्या मान्सून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या मृग नक्षत्र चालू असून ते कोरडे चालल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढत चालली आहे.

मृग नक्षत्राचे वाहन गाढव असून, या नक्षत्रात आणखी तीन दिवसात पावसाची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. तालुक्यात खरीप हंगामात बाजरी, तूर, सोयाबीन, उडीद, सूर्यफूल, मका या पिकांसह चारा पिकांच्या पेरणीसाठी शेतकर्‍यांनी जमिनीच्या पूर्वमशागतीची कामे आटोपून घेतली आहेत. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस पडताच खरीप पेरण्यांना प्रारंभ होईल, असे शेतकरी दयानंद गायकवाड (बोराटवाडी), शरद जगदाळे-पाटील (टणू), रमेश काकडे (बावडा) यांनी सांगितले.

सध्या जमिनीमधील पाण्याची पातळी अनेक भागात खोलवर गेल्याने विहिरी व विंधन विहिरी (बोअर) बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच बंधारे कोरडे पडत चालल्याने शेतातील उभी पिके कशी जगवायची, या चिंतेत शेतकरी वर्ग आहे. सध्या पावसाअभावी पेरण्या चालू झालेल्या नसल्याने कृषी सेवा केंद्रामधील बी-बियाणे, खतांना जेमतेमच मागणी आहे. परिणामी, कृषी सेवा केंद्रे शेतकर्‍यांअभावी ओस दिसत अडल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी, सध्या शेतकरी व नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचे प्रगतिशील शेतकरी भारत लाळगे (सराफवाडी), प्रतीक घोगरे गणेशवाडी, किरण पाटील (चाकाटी) यांनी सांगितले.

हेही वाचा

पिंपरी: पालखी मार्गावरील हातगाडी, स्टॉल दोन दिवस बंद ठेवणार

20 भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानकडून सुटका

नगर : शेतकर्‍यांनी फुलांचा बाजार पाडला बंद

Back to top button