पिंपरी: पालखी मार्गावरील हातगाडी, स्टॉल दोन दिवस बंद ठेवणार | पुढारी

पिंपरी: पालखी मार्गावरील हातगाडी, स्टॉल दोन दिवस बंद ठेवणार

पिंपरी: श्री संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा 21 व 22 जून रोजी पिंपरी-चिंचवड शहरातून पंढरीकडे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, वारकर्‍यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील देहू ते पिंपरी चिंचवड पुणे मार्गे सासवडपर्यंत पथारी, हातगाडी, स्टॉलधारक आपला व्यवसाय बंद करून महापालिका व पोलिस प्रशासनाला सहकार्य करणार आहेत.

महाराष्ट्र हॉकर फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजू बिराजदार, अनिल बारवकर, फरीद शेख आदीसह पुणे जिल्ह्यातील विक्रेते यावेळी उपस्थित होते. आळंदी व देहूच्या दिशेने जाणारे व पालखी मार्गातून परत येणार्‍या भाविकांची गर्दी, अनुचित प्रकार, चेंगराचेंगरी असे प्रकार होऊ नये म्हणून सुमारे पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे व्यवसाय बंद ठेवून वारकर्‍यांची सेवा करण्यात येते. मोफत चहा, नाश्ता, चरण सेवा, अल्पोपहार अशा सेवा फेरीवाल्याकडून करण्यात येत आहेत.

देहूरोड : तुकोबा निघाले विठुरायाच्या भेटीला, पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान

कोरोनाच्या दोन वर्षाच्या भयानक परिस्थितीमधून जात असताना अनेक फेरीवाल्यांची बिकट अवस्था आहे. कर्ज काढलेले आहेत. अशा स्थितीमध्ये 17 ते 22 तारखेपर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करू द्यायचे नाही, असा अजब आदेश पोलिस प्रशासन यांनी काढलेला आहे. पोलिस प्रशासन दबाव व विक्रेत्यांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे आम्ही पंधरा वर्षांपासून पालखीच्या आधीचा दिवस आणि पालखीच्या दिवशी सहकार्य करीत आहोत. मात्र, पाच दिवस जर व्यवसाय बंद ठेवणार असाल. तर, त्यांचे आर्थिक नुकसान पोलिस व महापालिका प्रशासनाने द्यावे, असे काशिनाथ नखाते म्हणाले.

Back to top button