

पिंपरी: महापालिकेच्या रुग्णालयांसाठी अतिरिक्त सुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी निवृत्त झालेल्या सैनिकांची मदत घेतली जाणार आहे. रूग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी एकूण 19 निवृत्त सैनिक एका वर्षांसाठी नेमले जाणार आहेत. पालिकेचे वायसीएम, भोसरी, थेरगाव, आकुर्डी, जिजामाता, तालेरा, सांगवी, यमुनानगर अशी 12 मोठी रूग्णालये आहेत. रूग्णालयांमार्फत अतिरिक्त सुरक्षारक्षकाची मागणी करण्यात आली आहे.
सुरक्षा विभागाकडील आस्थापनेवरील मनुष्यबळ अपुरे पडत असल्यामुळे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाकडील सुरक्षारक्षक नियुक्त करण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी 9 मे 2022 ला मान्यता दिली आहे. त्यानुसार 19 सुरक्षारक्षक नियुक्त केले जाणार आहेत. त्यांना दरमहा 29 हजार 397 वेतन दिले जाणार आहे. एका वर्षांसाठी 67 लाख 2 हजार 516 खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे.