राज्यात रविवारपासून मुसळधार | पुढारी

राज्यात रविवारपासून मुसळधार

पुणे : रेंगाळलेला मान्सून पुन्हा एकदा पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. येत्या रविवारपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गुरुवारी मान्सूनने संपूर्ण मध्य महाराष्ट्र, संपूर्ण मराठवाडा व्यापून विदर्भापर्यंत मजल मारली. राज्याचा केवळ एक टक्केच भाग व्यापणे बाकी असून तोही एक ते दोन दिवसांत पूर्ण होईल.

रविवारपासून राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. त्यात कोकण आणि घाटमाथा मुसळधार ते अतिमुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात 26 जूनपर्यंत पाऊस हजेरी लावणार आहे.

येत्या दोन दिवसांत मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, उर्वरित विदर्भ, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, हिमालयीन भाग, बिहार पूर्व उत्तर प्रदेश या भागात दाखल होण्याची शक्यता आहे.

थकीत उधारीसाठी हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांचा ताफा अडविला

रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट : हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. परिणामी या भागात मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यलो अलर्ट : कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ.

निम्मा महाराष्ट्र कोरडाच

राज्याच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. मात्र, त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. मान्सूनने महाराष्ट्र व्यापला मात्र, मान्सून दाखल होण्यापूर्वी काही भागात थोडा फार पाऊस झाला. पण, अद्याप मोठा पाऊस राज्यात झाला नाही. मान्सून ज्या भागात दाखल झाला तेथेही पावसाचे प्रमाण कमी आहे. पावसाळ्याच्या हंगामाचा पहिला महिना असलेल्या जून महिन्याच्या पंधरवड्यात राज्यात सरासरीच्या तुलनेत 57 टक्के पाऊस कमीच आहे. तर एकूण 24 जिल्ह्यांत 50 ते 80 टक्के पाऊस कमी झाला आहे.

19 जूनच्या आसपास अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती, तर उत्तर मध्य आणि दक्षिण गुजरातपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेच्या वरच्या भागात चक्रावात तयार होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे 19 ते 26 जून दरम्यान राज्यात पाऊस बरसणार आहे.
– अनुपम कश्यपि, हवामानशास्त्रज्ञ, पुणे वेधशाळा

हेही वाचा

पिंपरी : शहरात कोरोनाचे 96 नवे रुग्ण

निक म्हणतो, प्रियांका मजबूत ‘आई’

बांदा : गोवा दारूसह कार जप्त ; तरुणावर गुन्हा

 

Back to top button