‘लेका मी आता मंत्री झालोय, तुझं रं कसं बिल’, सदाभाऊंनी दिला होता दम, उधारीवरुन हॉटेल मालकाचा राडा (पहा व्हिडीओ) | पुढारी

'लेका मी आता मंत्री झालोय, तुझं रं कसं बिल', सदाभाऊंनी दिला होता दम, उधारीवरुन हॉटेल मालकाचा राडा (पहा व्हिडीओ)

सांगोला : पुढारी वृत्तसेवा; 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील 66 हजार 460 रुपये उधारीच्या पैशासाठी हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना सांगोला पंचायत समितीच्या आवारात अडवून धरत जाब विचारला. ते कारमधून खाली उतरताच भाऊ आपला पैशाचा विषय मिटवा म्हणून अडविले. यावेळी अचानक घडलेल्या प्रकारामुळे गोंधळ उडाला.

यावेळी सदाभाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सारवासारव करीत असतील पैसे तर देऊन टाकू असे म्हणून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर हे प्रकरण पोलीस स्टेशनला गेले. पंचायत राज्य समितीच्या सांगोला दौर्‍यात काल बुधवारी माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांचे सांगोला पंचायत समितीच्या आवारात आगमन होताच ते कारमधून खाली उतरले त्यावेळी कार्यकर्त्याच्या गर्दीतून अचानक मांजरी ता. सांगोला येथील हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी त्यांना आडवून भाऊ माझे सन 2014 मधील हॉटेलच्या बिलाचा विषय मिटवा असे म्हणून त्यांना रोखले अचानक या प्रकारामुळे सर्वांचे लक्ष त्या दोघांच्या चर्चेकडे वळले यावेळी शिनगारे यांनी या बिलासाठी मी 8 वर्षे वाट पाहिली, मी सदा भाऊंना बिलासंदर्भात फोन केला असता त्यांनी मला लेखा मी आता मंत्री झालोय, तुझं रं कसं बिल असे बोलून अपमानीत केले असा आरोप करीत ते काही नाही माझ्या बिलाचा विषयी मिटवा आणि मगच येथून जावा असे म्हणाला असता मंत्री सदा भाऊनी तुम्हच्या बिलासंदर्भात मला काहीच माहिती नाही असे म्हणताच हॉटेल मालकांनी तुमचा मुलगा सागर याला सगळे माहित आहे मला कोणी समजवायचे गरज नाही असे बोलत असताना भाऊंनी असेल बील तर देऊन टाकू असे म्हणून गर्दीतून खाली मान घालून कार्यक्रमाच्या ठिकाणी निघून गेले.

यावेळी रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले, तालुकाध्यक्ष भारत चव्हाण, प्रा. संजय देशमुख, शंभू माने यांनी त्यास समजावून तुझे जे काय बील असेल ते आम्ही देतो परंतु गोंधळ घालू नको असे समजावीत असताना त्यांने तुम्ही माझ्यामध्ये पडू नका माझं मी बघून घेतो असे त्यांना प्रतिउत्तर देत होता .यावेळी बंदोबस्तावरील पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन वाघ, पोलीस नाईक अमर पाटील यांनी गर्दीतून अशोक शिनगारे यास समजावत तेथून घेऊन गेले. घडल्या प्रकारामुळे पंचायत समिती आवारात सर्वजण काय झाले, कशाचा गोंधळ आहे म्हणून एकमेकांना विचारणा करीत होते. दरम्यान याबाबत आ. सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक आदिनाथ खपाले यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी त्याची कसलीही बिल वगैरे नाही असते तर भाऊंनी ते कधीच ठेवले नसते ही त्यांची निव्वळ स्टंटबाजी असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान घडल्या प्रकारानंतर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तात्काळ सांगोला पंचायत समिती येथे येऊन माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा केली असता माझ्याकडे त्याचे पैसे आहेत हे मला माहीत नाही असे म्हणून त्यांनी संबंधित अशोक शिनगारे याचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली.

Back to top button