सुवर्णा चव्हाण
पुणे : अमितने व्यसनमुक्तीवर एक लघुपट तयार केला अन् एका लघुपट महोत्सवासाठी पाठवला…त्या लघुपटाला पुरस्कारही मिळाला अन् प्रेक्षकांचा प्रतिसादही…सध्या महाविद्यालयीन वा नोकरदार तरुणाईचा कल लघुपटांच्या निर्मितीकडे वाढला आहे. वेब सीरिज अन् रिल्सपेक्षा आताच्या घडीला तरुणाई लघुपट मोठ्या प्रमाणात तयार करत आहेत.
प्रेम असो वा मानसिक ताणतणाव…ग्रामीण जगणे असो वा व्यसनाधीनता… असे वेगवेगळे विषय लघुपटांतून मांडण्यात येत आहेत. हेच लघुपट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवात, स्पर्धांमध्ये गाजत आहेत. लघुपट तयार करणारी संपूर्ण टीम संहितेपासून ते शूटिंगपर्यंतची जबाबदारी सांभाळत आहे. महिन्याला किमान 250 ते 300 नवीन लघुपट तयार केले जात आहेत.
वेगवेगळ्या विषयांवरील या लघुपटांना सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. त्यातून मिळणार्या जाहिराती, प्रायोजकत्व आणि स्पर्धांतील बक्षिसांच्या रकमेतून तरुणाईची कमाईही होत आहे. पण, काही जण कलाकारी म्हणून लघुपटांकडे वळले असून, आता तरुणांमध्ये लघुपटांची अधिक चलती आहे आणि तो ट्रेंडही आहे. दिग्दर्शक जयराम माळी म्हणाला, 'मी सैर हा लघुपट नुकताच तयार केला.
त्याला विविध लघुपट महोत्सवात पुरस्कारही मिळाले. आमच्या टीममध्ये सगळ्या टीमने मोठी मेहनत घेऊन लघुपट तयार केला. लघुपट हे कमी साधनातही तयार करता येतात आणि त्यातून आपल्याला हवे ते विषय कमी वेळेत समर्थपणे मांडता येतात.
सध्या तरुणांमार्फत महिन्याला अंदाजे 250 ते 300 लघुपट तयार होत आहेत. असंख्य लघुपट वेगवेगळ्या सोशल मीडिया व्यासपीठांवर प्रदर्शित होत असून, त्याला चांगला प्रेक्षकवर्ग आहे. तर काही लघुपट हे लघुपट महोत्सवांसाठी किंवा स्पर्धांसाठी पाठविले जातात. प्रत्येक स्पर्धेसाठी किमान 250 ते 500 लघुपट पाठविले जातात. त्यातील साधारपणे 50 लघुपटांची निवड उपात्यंफेरीसाठी होते. अंतिम फेरीसाठी 10 लघुपटांची निवड केली जाते आणि त्यातून सर्वोत्कृष्ट लघुपटांची निवड केली जाते.
सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात लघुपटांकडे वळली आहे. त्यात महाविद्यालयातील तरुणांसह नोकरदार तरुणाईही आहेच. काही जण यू-ट्यूब चॅनेलसह फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लघुपट प्रदर्शित करतात. तर काही जण आपले लघुपट महोत्सवांसाठी, स्पर्धांसाठी पाठवतात. सध्या या लघुपटांना चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यातून तरुणाई वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर व्यक्त होत आहे. मीही आपल्या लघुपटांतून विविध सामाजिक विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
– सचिन गवळी, लघुपटांचे दिग्दर्शक
हेही वाचा