कार आणि डंपरच्या अपघातात आजोबा, नातवाचा मृत्यू; पुणे-नगर रस्त्यावरील दुर्घटना | पुढारी

कार आणि डंपरच्या अपघातात आजोबा, नातवाचा मृत्यू; पुणे-नगर रस्त्यावरील दुर्घटना

पुणे, पुढारी वृत्तसेवा: भरधाव डंपर अचानक वळविल्याने कार आणि डंपरमध्ये झालेल्या अपघातात आजोबा आणि दीड वर्षाच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या अपघातात आणखी दोघे गंभीर जखमी झाले. चालकाने नगर रस्त्यावरील लोणीकंद येथे रस्त्याच्या मध्ये डिव्हायडरमधून अचानक डंपर वळविल्याने ही दुर्घटना घडली.

अद्वैत अमोल कुलकर्णी (दीड वर्ष) आणि महेश संभूस (वय 60, रा. मोशी) असे मृत्यू झालेल्या नातवाचे व आजोबाचे नाव आहे. याप्रकरणी डंपरवरील चालकावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अद्वैतची आई व महेश यांची मुलगी दीपा कुलकर्णी (वय 31) यांनी तक्रार दिली आहे. अपघातात दीपा व त्यांची आई नीलिमा या जखमी झाल्या आहेत.

वारीमध्ये वॉकीटॉकीवरून संवाद; शासकीय अधिकार्‍यांचा संपर्क अखंड सुरू राहण्यासाठी निर्णय

रविवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. दीपा कुलकर्णी या मूळच्या नाशिकच्या आहेत. त्यांचे सासर पुण्यात आहे. त्या पुण्यातच राहतात. दरम्यान, त्यांचे आई-वडील पुण्यात आले होते. त्यांना घेऊन त्या नाशिकला जात होत्या. दीपा या कार चालवत होत्या. त्या पुणे-नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरातल्या ओम साई हॉटेलसमोर आल्यानंतर डंपर चालकाने रस्त्याच्या मध्ये डिव्हायडर असणार्‍या ठिकाणावरून डंपर वळविला.

त्याचवेळी समोरून आलेल्या कारला उडविले. त्यात गंभीर जखमी झाल्याने दीपा यांचे वडील महेश व दीपा यांचा मुलगा अद्वैत यांचा मृत्यू झाला. तर, दीपा व त्यांची आई जखमी झाली आहे. या वेळी कारचेही नुकसान झाले. घटनास्थळावरून अपघात झाल्यानंतर फरार होण्याच्या तयारीत असलेल्या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक सुहास पाटील हे करीत आहेत.

हेही वाचा

शिवाजीराव भोसले बँकेकडून 263 कोटींचे वाटप पूर्ण; बँकेचे अवसायक धोंडकर यांची माहिती

बारामती तालुक्यात पेरण्या रखडल्या; दुबार पेरणीचे संकट टाळण्यावर भर

पुणे : सांगवी परिसरातील पेरण्या खोळंबल्या

Back to top button