दप्तराचे ओझे कागदोपत्रीच उतरले; केंद्र सरकारची नियमावली

दप्तराचे ओझे कागदोपत्रीच उतरले; केंद्र सरकारची नियमावली
Published on
Updated on

संतोष वळसे पाटील

मंचर : विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका व्हावी, यासाठी केंद्र सरकारने नियमावली बनवली आहे. यात विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक दप्तराचे वजन असू नये, असे सूचित केले आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश यापूर्वी राज्यांना देण्यात आले आहेत, परंतु कागदोपत्री माहितीवरच भर देऊन राज्याकडून प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र शून्यच झाल्याचे दिसत आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा विषय सातत्याने चर्चेत असतो. यात असणारी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके, वह्या, डबा, पाण्याची बाटली, खेळाचा गणवेश, इतर शालेय साहित्य अशा अनेक गोष्टींनी भरलेले दप्तर विद्यार्थ्यांच्या पाठीवर लादले गेले आहे. यात अनेकदा मूळ दप्तराचेच वजन अधिक असते. यात शालेय गृहपाठ वह्या यामुळे वजन अधिकच वाढते.

राज्य सरकारने यापूर्वी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत सर्व विषयांसाठी सत्रनिहाय एकच पुस्तक बनवणार असे जाहीर केले होते, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी अद्याप झाली नाही. पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नये व अभ्यासाची एकच वही असावी. तिसरी व पाचवीसाठी एक वर्गातील अभ्यासाची आणि एक गृहपाठाची अशा दोन वह्या असाव्यात. अधिक वह्या, पुस्तके आणावी लागणार नाहीत, असे वेळापत्रक सहावीपासून पुढे असावे. शाळेत पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

वर्गात शक्यतो सुट्टे कागद वापरून अभ्यास पूर्ण करून घ्यावा व त्याचे संकलन करून ते टाचून फायलिंग करून ठेवावे. विद्यार्थ्यांना वर्गात पाठ्यपुस्तके एकत्रित वापरण्याची किंवा एकमेकांत देवाण-घेवाण करण्याची मुभा द्यावी, पाठ्यपुस्तकावर वजनाचा उल्लेख असावा, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत याबाबत समिती नेमून विद्यार्थ्यांच्या दप्तराची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. शासनाने निश्चित केलेल्या दप्तराच्या वजनापेक्षा अधिक वजन आढळल्यास शाळांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे सर्व असताना हे केवळ कागदोपत्रीच राहिले आहे.

दप्तराचे वजन प्रत्यक्षात जास्तच

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम यामुळे दप्तराचे वजन वाढतच चालले आहे. यामुळे लहान वयातच मणक्याचे आजार होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे इयत्ता पहिली व दुसरीसाठी 1.6 ते 2.2, तिसरी ते पाचवीसाठी 1.7 ते 2.5, सहावी ते सातवीसाठी 2 ते 3, आठवीसाठी 2 ते 4.5, नववी व दहावीसाठी 2.5 ते 4.5, अकरावी व बारावीसाठी 3 ते 5.5 किलोग्रॅम दप्तराचे वजन असावे, असे सांगितले आहे, पण प्रत्यक्षात दप्तराचे खरे वजन यापेक्षा दोन ते अडीच किलोग्रॅमपेक्षा अधिक असते.

विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका होण्यासाठी काही वह्या, पुस्तके, शालेय साहित्य शाळेतच सुरक्षित ठेवण्यासाठी फर्निचरची सुविधा शासनाने करावी. पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या समन्वयाने वेळापत्रकात बदल, सर्व विषयांसाठी एकच वही, स्वच्छ पिण्याचे पाणी शाळेतच उपलब्ध करून द्यावे.

– मनीषा बाळासाहेब कानडे, माजी अध्यक्षा, आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news