कलिंगडाची वाढ पाण्याअभावी खुंटली; शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान | पुढारी

कलिंगडाची वाढ पाण्याअभावी खुंटली; शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान

मंचर, पुढारी वृत्तसेवा: काठापूर (ता. आंबेगाव) येथील कलिंगड पिकाची सध्या तोडणी अंतिम टप्प्यात आली असून, या ठिकाणी कलिंगड तोडणी करण्याची लगबग सुरू आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे या वर्षी अंतिम टप्प्यात कलिंगडाची वाढ खुंटल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात नदीकाठच्या गावांमध्ये तसेच उजवी कालव्याखालील गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगडाचे पीक घेतले जाते.

हे पीक ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरचा वापर करून घेतले जाते. त्यामुळे कलिंगडाला मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च येतो. सध्या कलिंगड काढण्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याची कमतरता जाणवल्याने कलिंगडाचे उत्पन्न घटले आहे. तसेच, बाजारभावही जेमतेम असल्याने शेतकर्‍यांना भांडवली खर्च जाता जास्त काही हाती आले नाही. काठापूर बुद्रुक येथील शेतकरी कमलेश नरवडे यांनी कलिंगडाची लागवड आपल्या दोन एकर क्षेत्रात केली होती. यासाठी त्यांनी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला. परंतु, शेवटच्या टप्प्यात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने कलिंगडाचा आकार वाढला नाही.

कलिंगडाला मोठ्या प्रमाणावर फळधारणा झाली होती. परंतु, पाण्यामुळे फळांची वाढ झाली नाही आणि जितके अपेक्षित धरले होते, तितके उत्पादन मिळाले नाही. या कलिंगड पिकासाठी त्यांना निखिल शिंदे आणि नितीन मांजरे यांनी मार्गदर्शन केले. चांगल्या प्रकारची फळे मिळाली. परंतु, पाण्याचा तुटवडा आल्याने व बाजारभाव कमी असल्याने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. मोठ्या प्रमाणावर फळे आल्यामुळे शेतात कलिंगडच कलिंगडे दिसत होती. सध्या या कलिंगडांची तोडणी अंतिम टप्प्यात आली असून, कलिंगड काढणीने वेग घेतला आहे.

हेही वाचा 

बेळगाव : विधान परिषदेच्या दोन जागांसाठी मतदानाला प्रारंभ

विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्‍न; मविआचे नेते देवेंद्र फडणवीसांना भेटणार ?

नाशिक : बिबट्यांच्या बछड्यांचा विहिरीत पडून मृत्यू

Back to top button