नाशिक : बिबट्यांच्या बछड्यांचा विहिरीत पडून मृत्यू | पुढारी

नाशिक : बिबट्यांच्या बछड्यांचा विहिरीत पडून मृत्यू

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात रविवारी (दि. 12) फुलेनगर (माळवाडी) परिसरातील निर्‍हाळे रस्त्यावर रोड येथील एका शेतकर्‍याच्या विहिरीत बिबट्याची दोन बछडे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

फुलेनगर येथे विष्णू त्र्यंबक भगत हे निर्‍हाळे रस्त्यावर वस्तीवर राहात आहेत. भगत हेे रविवारी त्यांच्या गट नं. 301 मधील शेतात जात असताना, विहिरीच्या पाण्यात बिबट्याचे दोन बछडे फुगून वर आलेले त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब पोलिसपाटील अर्चना भगत यांना कळविले. भगत यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली.

माहिती मिळताच वनअधिकारी साळवे, तांबे, वैद्य यांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिक तरुणांच्या मदतीने बाजेला दोर लावून दोन्ही बछडे विहिरीतून बाहेर काढले. यासाठी गावातील सुधाकर भगत, विष्णू भगत, कार्तिक भगत, भाऊसाहेब घोटेकर, विकास यादव, भाऊराव मंडलिक, सुनील भगत, सुरेश भगत, विवेक भगत, श्रीपत घोटेकर, नवनाथ घोटेकर यांनी मदत केली.
गेल्या महिन्यात खंडेराव पठाडे यांच्या कोरड्या विहिरीत बिबट्या पडला होता. त्याला काही दिवसांनी वनविभागाने पिंजर्‍यात जेरबंद केले होते. त्यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी झाल्याची घटना घडली होती. आता बछडे मृतावस्थेत आढळल्याने अजूनही परिसरात बिबट्या व एक बछडे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. वनविभागाने रामनाथ भगत यांच्या गिनीच्या शेतात पिंजरा लावला आहे.

कठडे नसल्याने विहिरीत पडल्याचा अंदाज
साधारण तीन ते चार महिने वयाचे नर जातीची बिबट्याची दोन्ही बछडे मृतावस्थेत आढळून आली. कठडे नसलेल्या विहिरीचा अंधारात अंदाज न आल्याने चार ते पाच दिवसांपूर्वी ही बिबट्याची पिले पडलेली असावीत, असा प्राथमिक अंदाज वनअधिकार्‍यांनी वर्तवला आहे.

हेही वाचा :

Back to top button