पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुणे पोलिसांकडून मान्सूनपूर्व तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मान्सूनच्या काळात आत्पकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास कसे काम करायचे, याची तयारी करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. धोका असणार्या ठिकाणांची माहिती देण्याचा आदेशदेखील पोलिस ठाण्यांना देण्यात आला आहे.
पूर आपत्ती व्यवस्थापन योजनेची रंगीत तालीम घेऊन त्याचा पूर्तता अहवाल सादर करण्याची सूचनादेखील देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर इमारतीच्या संरक्षक भिंती, घरे पडण्याचे प्रकार घडले आहेत, तर काही वेळा पूर येऊन जीवित व वित्तहानीदेखील झाली आहे. तसेच, नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे अनेक भागात पाणी शिरते.
तसेच, अनेक पूलदेखील पाण्याखाली जातात. तसेच, रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाबरोबरच पोलिसांनीदेखील मान्सूनपर्व तयारी सुरू केली आहे. त्या संदर्भातील सर्व माहिती गोळा करण्याच्या सूचना प्रत्येक पोलिस ठाण्याला दिल्या आहेत.
ही माहिती विशेष शाखेला गोळा केल्यानंतर ती जिल्हाधिकार्यांनादेखील पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याने त्यांच्या वरिष्ठ व गुन्हे निरीक्षकांचा क्रमांक, पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोहता येणारे पाच कर्मचारी, हद्दीतील पोहता येणार्या खासगी व्यक्ती, शोध व बचाव कार्यासाठी लागणार्या उपकरणांची उपलब्धता याची पूर्व तयारी करण्याच्या सूचना उपायुक्त, सहायक आयुक्त व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा