सातारा : माझी वसुंधरा अभियानात पालिका चमकल्या;मुंबईत जिल्हाधिकारी, मुख्याधिकार्‍यांचा आज गौरव | पुढारी

सातारा : माझी वसुंधरा अभियानात पालिका चमकल्या;मुंबईत जिल्हाधिकारी, मुख्याधिकार्‍यांचा आज गौरव

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा व कराड नगरपालिका तसेच दहिवडी नगरपंचायत आणि मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात चमकदार कामगिरी केली. राज्य शासनाकडून या पालिकांना पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने मुंबई येथे होत असलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्याधिकारी अभिजीत बापट, रमाकांत डाके, अवधूत कुंभार यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या अभियानातही सातारा जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा राज्य शासनाकडून सन्मान करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत अमृत गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या अमृत शहरांमध्ये सातारा नगरपालिकेचा समावेश झाला आहे. सातारा पालिकेेने राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशा तगड्या महानगरपालिकांशी मुकाबला करुन यश मिळवले.

तसेच या स्पर्धेअंतर्गत नगरपरिषद गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या कराड नगरपालिकेचा समावेश आहे. तर नगरपंचायत गटामध्ये दहिवडी नगरपंचायतीने बाजी मारली आहे. माण्याचीवाडी या ग्रामपंचायतीनेही या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके तसेच दहिवडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांचा या पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी आपल्या शहराने केलेल्या या कामगिरीबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्यावतीने पारितोषिक प्रदान करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने संबंधितांना कळवले आहे. हा सोहळा दि. 5 रोजी सकाळी 10.30 वाजता नरिमन पॉईंट येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, नगर विकास मंत्री, ग्राम विकास मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, पर्यावरणमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कुठल्या पालिका कोणत्या स्थानावर राहतील, याची उत्कंठा जिल्हावासियांमध्ये निर्माण झाली आहे.\

हेही वाचा :

 

Back to top button