ताबा घेण्यासाठी शेतजमिनीच्या वादातून पिकात घातला नांगर, बाबुर्डीच्या तिघांवर गुन्हा दाखल

वाळकी : शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी उभा पिकात घातला नांगर.
वाळकी : शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी उभा पिकात घातला नांगर.

वाळकी : पुढारी वृत्तसेवा

शेतीच्या वाटण्या झालेल्या असतानाही धमकावत शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी शेतकर्‍याच्या उभ्या पिकात नांगर घातला. शेतातील घास, उन्हाळी भुईमूग, गिन्नी गवत पिकांचे नुकसान केले. याचा जाब विचारायला गेलेल्या शेतकर्‍याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना नगर तालुक्यातील वाळुंजच्या शिवारात घडली.

या प्रकरणी बाबुर्डी घुमट येथील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अशोक पंढरीनाथ परभणे (वय 44, रा. बाबुर्डी घुमट, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी परभणे यांची वाळुंज गावच्या शिवारात गट नं.319 मध्ये शेती आहे. ही शेती वडिलोपार्जीत असून, त्यांच्या भाऊबंद आणि त्या शेतीच्या वाटण्याही झालेल्या आहेत.

असे असताना फिर्यादीच्या भाऊबंद त्यांची शेती बळकावण्याच्या प्रयत्नात आहेत. याच कारणावरून आणि शेत जमिनीचा ताबा घेण्यासाठी अरुण भानुदास परभणे व अन्य दोघे (सर्व रा.बाबुडी घुमट, ता. नगर) यांनी गुरुवारी (दि.2) दुपारी साडे चारच्या सुमारास फिर्यादी अशोक परभणे यांच्या शेतातील उभ्या पिकात नांगर असलेला ट्रॅक्टर घालून शेतातील घास, उन्हाळी भुईमूग, गिन्नी गवत पिकांचे नुकसान केले.

याचा जाब विचारायला गेलेल्या अशोक परभणे यांना या तिघांनी शिविगाळ करत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत जखमी अशोक परभणे यांना त्यांच्या कुटुंबीयांनी नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नगर तालुका पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news