

पुणे : पुढारी वृत्तसेवा
'मुख्यमंत्रिपदाचा पवार घराण्यातील नेमका कोण उमेदवार आहे, हे आमदार रोहित पवार यांनी आधी जाहीर करावे. त्यानंतर हयात नसलेल्या मुंडे साहेबांबद्दल बोलावे,' असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला. गोपीनाथ मुंडे हे 2014 चे खरे मुख्यमंत्री होते. ते हयात असते तर राजकारणाची आज जेवढी पातळी खाली गेली आहे तेवढी गेली नसती. त्यांनी टीका केली असती, पण तिची पातळी वर असती, असे मत रोहित पवार यांनी अहमदनगर येथील एका सभेत व्यक्त केले.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले, 'पवार कुटुंबातील अजित पवार, सुप्रिया सुळे यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी घेतली जातात. आता रोहित पवारही त्यावर बोलत आहेत. यावरून रोहित पवार यांच्या मनाच्या कोपर्यात कुठे मुख्यमंत्रिपदाची ओढ आहे, अशी शंका येते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा पवार घराण्यातील नेमका कोण उमेदवार आहे, हे आधी एकमताने जाहीर करावे, मगच रोहित पवार यांनी हयात नसलेल्या मुंडे साहेबांबद्दल बोलावे.
हयात नसलेल्या नेत्याचे नाव घेऊन वाद निर्माण करायला रोहित पवार अजून लहान आहेत. त्यांनी पवार साहेबांच्या ज्येष्ठत्वाचा अनुभव लक्षात घ्यावा आणि बोलण्याची घाई करू नये.' 'भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डावलले जात आहे का?' या प्रश्नावर दरेकर म्हणाले, 'पंकजाताई राष्ट्रीय नेत्या आहेत. मी भाजपचा लहान कार्यकर्ता आहे. त्यांच्याकडे मध्य प्रदेशच्या प्रभारी म्हणून जबाबदारी आहे. त्यांनी तेथील संघटन मजबूत केले आहे. अशा नेत्याविषयी मी बोलणे उचित नाही.' यावर जास्त बोलणे त्यांनी टाळले.
राज्यसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, 'तिसरा उमेदवार आम्ही मागे घेणार नाही, हे आधीच जाहीर केले आहे. आमचा तिसरा उमेदवार निवडणूक लढणार आणि जिंकणार. या निवडणुकीत काय होते, हे पाहून आम्ही विधान परिषदेसाठी पाचवा उमेदवार उभा करायचा की नाही, हे ठरविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.'
हेही वाचा