Nashik : मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह चुकीचा : पृथ्वीराज चव्हाण

Nashik : मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह चुकीचा : पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नवीन शैक्षणिक धोरणात अतिउत्साहामध्ये मातृभाषेतून इंजिनिअरिंग व वैद्यकीय शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, त्यामुळे केवळ मातृभाषेचा आग्रह चुकीचा आहे. इंग्रजीशी नाळ तोडल्यास त्याचे दुष्परिणाम पुढच्या दोन पिढ्यांना भोगावे लागतील, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला दिला आहे.

कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या 73 व्या स्मृतिदिनानिमित्त के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे रावसाहेब थोरात सभागृहात 'भारतीय अर्थव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने' या विषयावर पृथ्वीराज चव्हाण यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रतापराव वाघ होते.

पृथ्वीराज चव्हाण यांनी भाषणाच्या पहिल्या भागात भारतीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण केले. सध्याचा विचार करता, भारताची स्थिती श्रीलंका व पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल सुरू आहे की काय, असे अनेक तज्ज्ञांना वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. कर्ज काढा, कर वाढवा या धोरणानंतरही अर्थव्यवस्था आटोक्यात येत नसल्याने, सरकारने सार्वजनिक उपक्रम विकण्यास सुरुवात केली आहे. घरात अगदी शेवटचा पर्याय म्हणून गृहिणीचे मंगळसूत्र विकले जाते. त्याच पद्धतीने या सरकारची अवस्था होऊन सरकारी उपक्रम विकले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी 2014 नंतर भारतातील 2700 परकीय उद्योग देशाबाहेर गेले असल्याचे सांगून, 'मेक इन इंडिया' ही योजनाही अपयशी झाल्याचा आरोप केला. भारतीय अर्थव्यवस्थेवरील चर्चेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले ही चांगली बाब आहे. मात्र, मातृभाषेतून इंजिनिअरिंग व वैद्यकीय शिक्षण देण्यामुळे इंग्रजीपासून नाळ तुटण्याची शक्यता असून, त्यामुळे पुढील दोन पिढ्यांचे नुकसान होईल, असा इशारा त्यांनी दिला. यासाठी त्यांनी बाळासाहेब खेर यांनी महाराष्ट्रात इंग्रजी हा विषय आठवीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने मोठे नुकसान झाल्याचे उदाहरण दिले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news