

पुणे : पुढारी वृत्तसेवा
एमआयटी-एडीटी विद्यापीठ आणि क्रेडाई पुणे मेट्रो यांच्या वतीने रिअल इस्टेटमध्ये पदव्युत्तर पदविका आणि पदवी अभ्यासक्रमाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'रिअल इस्टेट क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन रिअल इस्टेट अँड इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट हा पदव्युत्तर पदविका आणि बॅचलर्स इन बिझनेस अडमिनिस्ट्रेशन (रिअल इस्टेट अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट) असे दोन नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहोत.
यासाठी या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे,' अशी माहिती एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका आणि अधिष्ठाता डॉ. सुनीता कराड, क्रेडाई पुणे-मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे, कुशल क्रेडाईचे अध्यक्ष जयप्रकाश श्रॉफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. रजनीश कौर बेदी, डॉ. आशा ओक आदी उपस्थित होते. पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी 60 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
या निवड प्रक्रियेत ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीचा समावेश असेल. कुशल क्रेडाईचे अध्यक्ष जय प्रकाश श्रॉफ म्हणाले, 'रिअल इस्टेट क्षेत्रातील हा वेगळ्या प्रकारचा उपक्रम ठरणार आहे. या क्षेत्रातील ज्ञान, शिक्षण मिळण्यासाठी एखादी संघटना आणि शैक्षणिक संस्था यांच्या पुढाकाराने होणारा हा पहिला उपक्रम आहे.' क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे म्हणाले, 'बांधकाम उद्योग क्षेत्रात तांत्रिक आणि कौशल्य प्रशिक्षित कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे ही दरी भरून काढण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोने एमआयटी-एडीटी विद्यापीठाशी हा सामंजस्य करार केला आहे.'
हेही वाचा